राजीव सातव यांना श्रद्धांजली :राष्ट्रीय पटलावर उमटविणारा उमदा नेता  गमावला  

प्रद्युम्न गिरीकर
देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या विपरीत परिस्थिती असताना देखील सातव यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यथायोग्य पार पाडत काँग्रेस करिता आशेचा किरण निर्माण केला होता. त्यामुळेच पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये उमदा चेहरा म्हणून सातव यांच्याकडे बघितल्या ​जाऊ ​ लागले होते. दुर्दैवाने आज रविवारी यांचे दुःखद निधन झाले. यामुळे केवळ काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर एका अर्थाने महाराष्ट्राचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांच्या श्रद्धांजली मधून व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मूळ मसोड गाव असणाऱ्या राजीव सातव यांनी याच पंचायत समिती गणातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव या माजी मंत्री राहिलेल्या असतानादेखील थेट कुठलेही राजकीय पद मिळविण्यापेक्षा राजकारणाचा सुरुवातीपासूनचा अभ्यास आणि स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याकरिता सातव यांनी पंचायत समिती लढविण्याचा निर्णय घेतला. मसोड पंचायत समिती गणातून निवडून आल्यानंतर सातव यांनी मागे कधीच वळून बघितले नाही. त्यानंतर 2005 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर हिंगोली जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून त्यांना राजकारणातली पहिली महत्त्वाची संधी मिळाली. याच काळात त्यांनी युवक काँग्रेसमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना 2008 मध्ये प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. दोन वर्षाच्या कार्यकाळात सातव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसची नवीन घडी बसविण्यात यश मिळविले.

2009 विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस मधून अनेक मातब्बर इच्छुक असताना पक्ष नेते राहुल गांधी यांनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सात युवकांची यादी उमेदवारी करिता शिफारस म्हणून पाठविली होती. ज्यामध्ये राजीव सातव यांच्या नावाचा समावेश होता. इथूनच त्यांच्या राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या सुरुवातीचा खऱ्या अर्थाने आरंभ झाला. 

2009 विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवल्यानंतर सातव यांनी मतदार संघात अनेक विविध विकास कामे खेचून आणली. त्याच बरोबर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आपला संपर्क देखील तेवढा मजबूत केला. म्हणूनच अवघ्या वर्षभरात 2010 मध्ये त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांनी सोपविली.

2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण देशभरामध्ये मोदी लाट निर्माण झाली होती. हिंगोली लोकसभा मतदार संघात त्यावेळी शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे खासदार होते। युती सरकार असल्यामुळे व मोदी लाट असल्याने या मतदारसंघात देखील वानखेडे पुन्हा विजयी होतील असा कयास लावला जात असताना आपल्या राजकीय मुस्तेदीगिरीची कमाल दाखवत सातव यांनी निसटता विजय मिळविला. राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते मोठ्या फरकाने पराभूत झाले असताना लोकसभे सारख्या क्षेत्राकरीता नवख्या असणाऱ्या सातव यांनी मिळवलेला विजय हा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला दखल घेण्या पर्यंतचा ठरला. त्यामुळेच पक्ष नेते राहुल गांधी यांच्या आणखी निकटचे व विश्वासाचे स्थान संपादित करण्यात सातव यांना यश आले.सातव यांचा राजकीय व सामाजिक अभ्यास लक्षात घेऊनच काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील टाकल्या.

लोकसभा कारकीर्दीच्या दरम्यान सातव यांनी कॅग रिपोर्ट, ईपीएफओ यासारख्या आर्थिक विषयांसह देशातील दलित आदिवासी व अविकसित समाजाकरिता अनेक विविध प्रश्न सभागृहात उपस्थित केले. लोकसभेमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल 1075 प्रश्न उपस्थित केले. एवढ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा घडविणारे भारतातील ते पाचवे खासदार आहेत. शिवाय  सभागृहातील यांची  उपस्थिती देखील  इतर  खासदार पेक्षा  अधिक ठरली .

लोकसभेतील त्यांचा कार्यकाळ पाहून त्यांना चार वेळा संसद रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सौराष्ट्र विभागाचे प्रभारी म्हणून सातव यांनी काँग्रेस पक्षाची जबाबदारी पार पाडली. ज्यामध्ये या विभागात पक्षाला महत्त्वाचे यश मिळविण्यात सातव यांची मोलाची भूमिका होती. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी राज्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यानंतर राहुल गांधी यांनी सातव यांना संपूर्ण गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात राज्याच्या प्रभारी पदाचे सूत्र काँग्रेसने सातव यांच्या हाती दिले यावरूनच त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती लक्षात येते. त्याचबरोबर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे ते कायम निमंत्रित सदस्य देखील होते. लोकसभा खासदार म्हणून काम करताना त्यांनी संरक्षण समिती, रेल्वे समिती, समाज कल्याण समिती याचबरोबर संयुक्त संसदीय समितीचे सदस्य म्हणून देखील सभागृहात मोलाची भूमिका बजावली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी सातव यांच्यावर गुजरात सह केरळ राज्यातील काही जबाबदाऱ्या टाकल्याने त्यांनी लोकसभा न लढवता पक्षादेश मानत आपले कार्य पार पाडले. मागील वर्षी राज्यसभेसाठी खासदार म्हणून पक्षाने सातव यांना संधी दिली. 13 मार्च 2020 रोजी सातव यांनी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व जयंत पाटील आदि सन्माननीय व्यक्तींची उपस्थिती होती. राज्यसभेत गेल्यानंतर केंद्र शासनाने लादलेल्या विवादित कृषी कायद्याच्या विरोधात सातव यांनी राज्यसभेमध्ये तीव्र आवाज उठविला. आवाजाची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप करताना सातव यांनी केंद्र सरकार वर प्रचंड टीका केली. या दरम्यान झालेल्या गोंधळामुळे सातव यांच्यासह पाच खासदारांना निलंबित देखील करण्यात आले होते. निलंबनानंतर सभागृह परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सातव यांनी केलेले उपोषण आंदोलन हा देशभर चर्चेचा विषय बनला होता. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर त्यांनी केलेले भाषण हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिकित्सा करणारे होते. सभागृहातील पक्षाच्या भूमिके बरोबरच सभागृहाच्या बाहेर देखील सातवांची पक्षा करिता धडपड तेवढीच महत्त्वाची ठरली.

जुलै 2020 मध्ये राजस्थान काँग्रेसमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात फूट पडली होती. याकरिता राहुल गांधी यांनी पाठविलेल्या पॅच अप टीम मध्ये सातव प्रमुख होते. सातवां यांच्या राजकीय शिष्टाई मुळेच पायलट गहिलोत यांच्यात समेट घडून आला. महा विकास आघाडी स्थापनेपूर्वी  शिवसेना नेते संजय राऊत  यांच्याशी असलेले सख्य  सातव यांनी  आघाडी निर्माण करण्याकरिता  अतिशय  योग्य पद्धतीने  हाताळले.

 युवा ब्रिगेड मध्ये काम करताना सातव यांनी राज्यातील अनेक चेहऱ्यांना समोर आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. यामध्ये विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, असलम शेख यासारख्या तरुणांना संधी मिळाली. पक्षीय जबाबदार्‍या पार पडताना देखील आपल्या मतदारसंघाकडे त्यांनी केव्हाही दुर्लक्ष केले नाही. हिंगोली येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा कोव्हिड काळामध्ये रेमेडीसिवर व ऑक्सिजनचा पुरवठा संदर्भात त्यांनी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेला पाठपुरावा असो यातून त्यांचे असलेले लक्ष अधोरेखित होते.आपल्या चोवीस दिवसांच्या आजारपणात सातव यांनी कोरोनावर मात केली परंतु सायटोमॅजीलो या दुर्लभ विषाणूने त्यांचा घात केला. अतिशय कमी कार्यकाळात महाराष्ट्राचे नाव राजकारणाच्या राष्ट्रीय पटलावर उमटविणारा उमदा नेता आज आपण गमावला चतुरस्त्र, अभ्यासू व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सातव यांना महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…