सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे सदा सरवणकर ; ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांची उचलबांगडी

मुंबई,७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनाय मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपददी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून या पदाची सूत्रे होती. परंतु, आता तडकाफडकी मंदिर न्यासाचे अध्यक्षपद सदा सरवणकरांकडे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर आता सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.

“मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करुन सिद्धीविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली आहे. गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल”, असं सदा सरवणकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “सिद्धीविनायक मंदिर न्यास से कोणत्याही गटाकडे नव्हतं. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेल्या अनेक वर्ष काम करणाऱ्या शिवसेनेकडे होतं. त्याच विचाराने पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे ही जबाबदारी आली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी आमि गटातटात विचार न करता भाविकांना जास्तीत जास्त कशा सुविधा उपलब्ध करुन देता येतील याचा प्रयत्न केला जाईल.”, असंही ते म्हणाले.

कोण आहेत सदा सरवणकर ?

दरम्यान, सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्या वर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यात सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. मात्र, चौकशीनंतर सरवणकर यांना क्लिन चिट मिळाली होती. याच प्रकरणामुळे त्यांचं मंत्रीपद हुकल्याची देखील चर्चा रंगली होती.

अशात आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरुन आदेश बांदेकर यांना हटवून सरवणकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.