अन्न व औषध प्रशासन विभागाकडून २ लाख ८६ हजार रुपयांचा साठा जप्त

• अन्न पदार्थ, खाद्यतेलाचा समावेश

• ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

लातूर,६ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-सणासुदीच्या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन, फरसाण, खाद्यतेल, वनस्पती, तूप, आटा, रवा, मैदा, बेसन, ड्रायफ्रुट, चॉकलेटस व तत्सम अन्न पदार्थाची मागणी जास्त असते. त्यामुळे नफा कमाविण्यासाठी काहीजण अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून किंवा अस्वच्छ, आरोग्यास अपायकारक वातावरणात अन्न पदार्थांचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने 60 अन्न पदार्थांचे नमुने चाचणी व विश्लेषणासाठी घेतले आहेत. तसेच सुमारे 2 लाख 86 हजार रुपयांचा अन्न पदार्थ व खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत एका उत्पादकाकडे तपासणी करून इंडीयन डिलीशियस स्वीट या अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. तसेच भेसळीच्या संशयावरून उर्वरीत सुमारे 87 हजार रुपये किंमतीचा 348 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. एका तेल उत्पादकाची तपासणी करून सुर्यफूल तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेवून सुमारे 1 लाख 34 हजार 790 रुपयांचा अंदाजे 1348 किलो खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या एका तेल उत्पादकाच्या तपासणीमध्ये शेंगदाणा तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच 64 हजार 440 रुपये किंमतीचा सुमारे 358 किलो साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये पुढील कार्यवाही घेण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या अन्न पदार्थाबाबत काही तक्रारी असल्यास, अन्न पदार्थामध्ये भेसळ होत असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लातूर कार्यालयास किंवा 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.