आता गावागावात आमरण उपोषण ! मनोज जरांगेंकडून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

आंतरवाली सराटी ,२८ ऑक्टोबर / प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसतेय. त्यात ते डॉक्टरकडूनही उपचार घेत नाहीत. या अशा अवस्थेत त्यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन केले आहे. अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची रुपरेषा काय असणार ते त्यांनी आज सांगितले.

मनोज जरांगे यांनी आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, यादरम्यान कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना, “मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. पण आरक्षणासाठी कोणीही जीवन संपवू नका, ही मी हात जोडून विनंती करतो. सरकारने गांभीर्याने घ्यावे. तुमच्या कोणत्या नातलगासोबत असे झाले, तर रात्रभर झोप येणार नाही. लोकांची लेकरं मरत असताना मजा बघू नका” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच सरकारने आमचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने आता गांभीर्याने आंदोलनाची दखल घ्यावी. सरकारने आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे, असे आवाहनही मनोज जरांगेंनी केले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सध्या गावागावात साखळी उपोषण सुरू आहे. आता हा लढा आपल्याला आणखी तीव्र करावा लागणार आहे. यासाठी जिथे जिथे साखळी उपोषण सुरू आहे. तिथे तिथे आता आमरण उपोषण सुरू करा.

सरकारला पुन्हा अल्टीमेटम देताना मनोज जरांगे म्हणाले, उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू होत आहे. कुणाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला पूर्ण जबाबदार हे सरकारच राहील. तसेच, या आंदोलनाचीही सरकारने दोन दिवसांत दखल घेतली नाही. तर ३१ ऑक्टोबरला आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करू, असेही मनोज जरांगेंनी जाहीर केले.

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. काल नांदेडमध्ये खासदारांची गाडीही फोडण्यात आली. तसेच, यवतमाळमध्येही एसटी पेटवल्याची घटना घडली. यावरुन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला पुन्हा शांततेचे आवाहन केले. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा नको. तसेच, कुणीही आत्महत्या करू नका. आपल्याला लढून हे आरक्षण मिळवायचे आहे. आपण एकत्र लढू, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले. “कोणीही उग्र आंदोलन करु नका, शांततेत आंदोलन करा. आपल्या गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने यायचे नाही आणि आपणही कोणत्या नेत्याच्या दारात जायचे नाही,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता एकत्र यावे. या नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये. तातडीने मुंबईला निघावे. तेथे मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घ्यावी. विशेष अधिवेशन बोलवावे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेते पक्षभेद विसरुन एक झाले आहे, असा संदेश दिल्लीत गेला पाहीजे. मराठा आरक्षण मिळाले तर या नेत्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचू.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे अन्नपाण्याशिवाय तीव्र उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. असे असले तरी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. आता माझ्यावर मराठा आरक्षण हेच उपचार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जाणार आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे साखळी उपोषण केले जाणार आहे.

धनगर समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

धनगर समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यशवंत सेनेचे पदाधिकारी अंतरवाली सराटीत जरांगेंना भेटले. मनोज जरांगे यांना राज्यभरातून समर्थन वाढत आहे.

मराठा आंदोलकांनी अडवला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा

मराठा आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवले. आंदोलकांच्या भीती पोटी प्रशासनाने रात्रीतूनच कार्यक्रमाचे स्थळ बदलले. तरीही मराठा आंदोलकांनी शनिवारी नांदेडमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे भागवत यांच्या ताफ्यातील पोलिस सुरक्षेचा मोठा गोंधळ उडाला.

यवतमाळमध्ये अज्ञातांनी एसटी बस पेटवली

यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर १०-१२ अज्ञातांनी मध्यरात्री ७२ प्रवाशांना खाली उतरवून एसटी बस पेटवल्याची घटना घडली. ही बस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याहून नागपूरकडे जात होती. आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.