‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात आले अन् 390 कोटी शोधून काढले

जालन्याच्या छाप्यात एकूण 390 कोटी, 58 कोटींची कॅश, 32 किलो सोन्याचे दागिने, 16 कोटींचे हिरे-मोती, आयकर विभागाचे 260 अधिकारी, 120 गाड्या

आयकर विभागाने महाराष्ट्रात राबवली तपास मोहीम

जालना,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- एखाद्या सिनेमाला लाजवले असा छापा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकला. छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले आणि आठ दिवस छापे मारून 390 कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.

Image

स्टिल उत्पादनामध्ये जालना हा महाराष्ट्रात नावाजलेला आहे. पण, आयकर विभागाने स्टिल कारखानदारांचा बेकादेशीर उद्योग चव्हाट्यावर आणला आहे. आयकर विभागाने स्टिल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घर, फार्महाऊस आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छाप टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.

जालन्यातील या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला.कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले.

आयकर विभागाने 03.08.2022 रोजी स्टील टीएमटी बारचे उत्पादन करणाऱ्या दोन प्रमुख समूहांच्या मालकीच्या आस्थापनांच्या परिसरात तपास मोहीम राबवली. या तपास मोहिमेत जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबई येथील 30 पेक्षा जास्त परिसरांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले.

Image

या तपास मोहिमेत अनेक गुन्हादर्शक साक्षीपुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.दोन्ही समूहांमधून जप्त करण्यात आलेल्या  पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते अनेक संस्थांकडून बनावट खरेदीद्वारे खर्चाचा आकडा फुगवून मोठ्या प्रमाणात करचोरी करत होते. या संस्था  जीएसटी बुडवण्यातही  गुंतल्या असल्याचे  आढळून आले आहे. रुपये 120 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या कच्च्या मालाच्या साठ्याची हिशेबाच्या वहीत नोंद नसल्याचे देखील पुराव्यांमधून आढळून आले आहे.

एका समूहामधून हस्तगत झालेल्या पुराव्यांच्या तपासणीमधून असेही दिसून आले आहे की या समूहाने कोलकाता येथील शेल कंपन्यांकडून मिळवलेले बोगस असुरक्षित कर्ज आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून आपले बेहिशेबी उत्पन्न प्राप्त केले आहे. या समूहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सहकारी बँकांमध्ये उघडले गेलेले अनेक लॉकर्स देखील शोध पथकाला या तपासणीमध्ये सापडले आहेत. या तपास मोहिमेत सहकारी बँकांमधील लॉकर्ससह 30 पेक्षा जास्त बँक लॉकर्सचा शोध लागला आहे. या लॉकर्समध्ये  मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले आहेत. 

Income tax officials came to Jalna saying 'Dulhan Hum Le Jayenge' and SEIZED assets worth Rs 390 Crore

त्याशिवाय, यापैकी एका समूहाच्या मालकीच्या फार्म हाउसवरील गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.आतापर्यंत, या तपास मोहिमेत 56 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 14 कोटी रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

वऱ्हाडी बनून आले अधिकारी!

विशेष म्हणजे, जालन्यात येण्याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली. आपल्या कारवाईची कुणकुण कुणाला लागू नये म्हणून वऱ्हाडी बनून आले.  कुणालाच याची खबर लागू नये म्हणून लग्नाच्या गाड्यातून हे अधिकारी शहरात पोहोचले होते. विशेष म्हणजे, आपण खरेच लग्नाला आलो आहोत, हे दाखवण्यासाठी गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकरही लावण्यात आले होते. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्यांवर सुद्धा असे स्टिकर लावले होते. एका गाडीवर तर वर आणि वधूचे स्टिकर लावलेले होते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गटाला विशेष असा कोडवर्डही दिला होता. एकूण 260 अधिकारी आणि 120 गाड्यांचा हा ताफा होता.