शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?-पंतप्रधान मोदी
शिर्डी ,२६ ऑक्टोबर / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच शरद पवारांवर टीका केली आहे.
मोदी यांनी शिर्डीत आल्यावर प्रथम साई समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानतर्फे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक, भव्य दर्शन रांगेचे उद्घाटन केले. त्यानंतर निळवंडे धरणावर जाऊन जलपूजन आणि कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डी विमानतळाशेजारी आयोजित सभेच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. तेथे त्यांच्या हस्ते नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. सभेत बोलताना सुरवातीला त्यांनी ह.भ.प. बाबा महाराज सातरकर यांचा विशेष उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते पूर्वी केंद्रात कृषी मंत्री होते. व्यक्तीगतरित्या मी त्यांचा सन्मान करतो. मात्र त्यांनी सात वर्षांच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केले? त्या काळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांची हमी भावाने धान्य खरेदी केली होती. आम्ही याच काळात साडे तेरा लाख कोटी रुपयांची खरेदी करून ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले आहेत. ते कृषी मंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आम्ही ही पद्धत मोडीत काढली. धान्यच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले.
“२०१४ च्या आधी तेलबियांची आणि कडधान्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ५०० ते ६०० कोटींची उत्पादने एमएसपीवर खरेदी केली जात होती. पण आमच्या सरकारने तेलबिया आणि कडधान्यांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १ लाख १५ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. ते (शरद पवार) जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना स्वत:च्या पैशांसाठीही दलालांच्या भरवशावर राहावं लागत होतं. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली,” असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अलीकडेच आमच्या सरकारने रबी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली आहे. चणा पिकासाठी १०५ रुपये तर गहू आणि कुसूम पिकांसाठी एमएसपीमध्ये १५० रुपयांची वाढ केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप लाभ होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही आम्ही चांगल्याप्रकारे काळजी घेत आहोत. सरकारने गेल्या ९ वर्षांत ७० हजार कोटी रुपयांचं इथेनॉल खरेदी केलं आहे. हा सर्व पैसाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.