प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो- प्रकाश आंबेडकर

मुंबई ,१२ जानेवारी  / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आल्यानंतर प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झालेली असून आम्ही आगामी निवडणुका सोबत लढणार आहोत, असे वंचितच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान, एकीकडे या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, या भेटीबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच सविस्तर माहिती दिली. प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवरही भाष्य केले. ते आज (१२ जानेवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

सध्या सगळीकडेच संभ्रमाची स्थिती आहे. आमचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा विचार आहे. आपण या चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगू, असा आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. आता युती कधी जाहीर करायची हे शिवसेनेने ठरवायचे आहे. ही युती जोपर्यंत जाहीर होणार नाही, तोपर्यंत अनेक तर्क लावले जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट ही राजकीय आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.