पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही

दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा एल्गार

सावरगाव : ‘माझ्याकडे पद नाही, खुर्ची नाही.. तरीही तुम्ही माझ्यासाठी आला आहात तेव्हा शांतपणे भाषण ऐका. घोषणा बंद करा’, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज दसर्‍याच्या दिवशी तुफान भाषण केलं. दसर्‍यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा झाला. प्रचंड ऊन असतानाही हजारो कार्यकर्ते भाषण ऐकण्यासाठी जमले होते. यावेळेस पंकजा मुंडे यांनी त्यांच्याकडे पद नसतानाही पक्षावर असलेल्या निष्ठेचा पुन्हा उल्लेख केला, तसंच विरोधकांना चांगलंच सुनावलं.

पंकजा मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सातत्याने माध्यमांतून होत असतात. आपल्या निष्ठेवर सवाल उठवला गेला, या कारणास्तव त्यांनी राजकारणातून दोन महिने ब्रेकही घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देऊनही तुम्हाला निष्ठा मिळवता आली नाही. पदं न देताही निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात आले. दहा वेळा यांचं स्वप्न तुटलं. पण पुन्हा यांच्या डोळ्यांत स्वप्न जन्म घेत आहे. (निवडणुकीत) मी पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू महेशही आपल्या युद्धात हरले होते. श्रीदेवांनाही युद्धाचं संकट आहे. देवीलाही असुरांविरोधात युद्ध करावं लागतं. मग युद्धाला आपण का तयार राहणार नाही? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात पडल्यावर कुबड्या घेऊन चालावं लागतं. या कुबड्या पक्ष देऊ शकते किंवा जनता देऊ शकते. मी राजकारणात पडले आणि मला जनतेने एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यांत मॅरेथॉनमध्ये पळण्याची हिंमत माझ्यात आली.

इकडची तिकडची सीट लढणार नाही

राजकारणात नेत्यांपासून ताईपासून आता मी आईच्या भूमिकेत आहे. त्यामुळे माझ्या लोकांचं हित बघणं हे माझं परमकर्तव्य आहे. त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. दुसऱ्याचं हडपून खाणं माझं कर्तव्य नाही. इकडची सिट लढा तिकडची सीट लढा, प्रीतमताई घरी बसतील तुम्ही लढा असलं काही चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. तुम्ही म्हटलं तर कापूस वेचायला जाईल, ऊस तोडायला जाईल. पण स्वाभिमान गहान ठेवणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाणार नाही

भर उन्हात पंकजा मुंडेंचा मेळावा सुरु होता. त्यामुळे तिथे जमलेल्या जनतेला पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हाला द्यायला साधी सतरंजीसुद्धा माझ्याकडे नाही. तुम्हाला मला खायला घालता येत नाही आहे. तुम्ही उन्हात बसला आहात म्हणून स्टेजवरच्यांनाही उन्हात ठेवलं आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्याच्या डोक्यावर सावली ठेवणाऱ्याचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला पद देऊ नका, पण मी माझ्या माणसाला दूर ठेवू शकत नाही. ज्याला ज्याला पदे दिली ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. पण ही जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाणार नाही.”

आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर आम्ही उन्हात बांधू

त्या पुढे म्हणाल्या की, भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. आता आपल्याला ऊन लागणार नाही. आता आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर आम्ही उन्हात बांधू. आता माझी माणसं उन्हात राहणार नाहीत. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. माझी माणसं भगवान शिवाचं रूप आहेत. शिवशंकर खूप भोळा आहे. पण त्यालासुद्धा तिसरा डोळा आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं.