छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पैठण औद्योगिक वसाहत अन् शहरात छापेमारी

छत्रपती संभाजीनगर ,२२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पैठण औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगरमध्येही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये कोकेन, मेफाड्राॅन, केटामाईन, या तीन प्रकारचा २५० कोटींपेक्षा अधिक किंमत असलेला अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संदीप शंकर कामावत याला अटक करण्यात आली असून त्याला पैठणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महसूल गुप्तचर संचालनालयाचा  अहमदाबाद विभाग आणि गुजरात पोलीसांची अहमदाबाद गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे  महसूल गुप्तचर संचालनालयाने शुक्रवार, 20.10.2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी  कायदा 1985 अंतर्गत शोधमोहीम राबवली. नंतर औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या कारवाईत सहकार्य केले.

यातील एका आरोपीच्या निवासी परिसराची झडती घेतल्यावर सुमारे 23 किलो कोकेन, सुमारे 2.9 किलो मेफेड्रोन आणि  30 लाख रुपये मूल्याच्या भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या .

पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त करण्यात आले.

या अंमली आणि मनोविकृतीकारक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किमत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची नोंद केली गेली आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी  कायदा 1985 (NDPS 1985) च्या संबंधित तरतुदींनुसार हे सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिककारखान्यांचा गैरवापर ही गोष्ट महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. त्याचबरोबर देशात अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतर-एजन्सी सहकार्याचे महत्त्व देखील या कारवाईने अधोरेखित झाले आहे.