अश्लील बोलण्‍याने  घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिंनीची  धावत्‍या रिक्षातून उडी

पोलिसांनी तपास करुन आरोपी रिक्षा चालकाच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- रिक्षात बसलेल्या एकट्या विद्यार्थिनीला पाहून अश्लील बोलण्‍याने  घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिंनीने धावत्‍या रिक्षातून उडी घेत आपली सुटका केली, मात्र यात पीडिताच्या  डोक्याला गंभीर दखापत झाली. घटनेच्‍या काही तासातच पोलिसांनी तपास करुन आरोपी रिक्षा चालकाच्‍या मुसक्या आवळल्या. अकबर हामीद सय्यद (३९, रा. प्‍लॉट क्रं. १५६, कैसरबाग, कासंबरी दर्गा, पडेगाव) असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव असून त्‍याला १८ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी बुधवारी दि.१६ दिले.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, पीडिता ही १२ वीत सायन्‍सचे शिक्षण घेते. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पीडितेला तिच्‍या वडीलांनी दुचाकीवर उस्‍मानपुरा येथील खासगी क्लासला सोडले होते. दुपारी सव्वाबारा वाजता क्लास संपल्यानंतर पीडिता गोपाल टी येथून घराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यादरम्यान, पाच-सहा वेळा आरोपीच्‍या रिक्षात प्रवास केल्याने आरोपी तिच्‍या तोंड ओळखीचा झाला होता. तो आरोपी तेथे रिक्षा (क्रं. एमएच-२०-ईएफ-१५६२) घेऊन आला. पीडिता त्‍याच्‍या रिक्षात बसली. क्रांती चौक-सिल्लेखाना मार्गे रिक्षा खोकडपुऱ्याच्या दिशेने वळला. त्‍यावेळी आरोपी रिक्षा चालकाने पीडितेची माहिती विचारण्‍यास सुरवात केली. तुला फिरायला आवडते का, तुझे नाव काय, वय काय, तुला सेक्स करायाला आवडते काय असे अश्लिल प्रश्‍न विचारण्‍यास सुरवात केली. घाबरलेल्या पीडितेने संकल्प क्लासेस जवळ रिक्षाची गती कमी झाल्यावर क्लासेस समोरच धावत्या रिक्षातून उडी मारली. यात पीडितेच्‍या डोक्याला मार लागला. तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एमएलसी आल्यानंतर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्‍या काही तासात ४० सीसीटीव्‍हींचे फुटेज तपासल्यानंतर रिक्षा चालक आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी घडलेला प्रकार हा सामाजिक दृष्‍ट्या अतिशय संवेदनशिल असल्याने त्‍याचा सखोल तपास करयाचा आहे. आरोपी यापूर्वी देखील असे कृत्‍य केले असण्‍याची शक्यता नाकरता येत नाही. पीडितेला गंभीर इजा झाली असून तिच्‍यावर उपचार सुरु आहेत. उपचारा दरम्यान तीने आरोपीला ओळखू शकते असे सांगितल्याने आरोपीची ओळख परेड घ्‍यायची आहे. पीडितेचा जबाब नोंदवायचा आहे. घटना घडतानांचे दृष्‍य सीसीटीव्‍हीत कैद झाले असल्याने ते सीसीटीव्‍ही फुटेज जप्‍त करयाचे आहे. प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदारांचे तसेच रिक्षा आरोपीच्‍या ताब्यात देणार्याचा जबाब नोंदवायचा आहे. आरोपीचा आणखीकाही गंभीर स्‍वरुपवाचा गुन्‍हा करण्‍याचा उद्देश होता, गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

नराधमास कठोर शिक्षा करण्याची मागणी

शहरातील खोकडपुरा भागातील अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करून रिक्षाचालकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या कुटुंबियांना शिवसेनेने आज आधार देत पाठीशी असल्याचे सांगितले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अस्थावाईकपणे चौकशी करून सय्यद अकबर सय्यद हमीद या नराधमास कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपशहरप्रमुख सतिश कटकटे, अनिल जैस्वाल, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, माजी नगरसेविका सुनीता सोनवणे,  उपशहर संघटक सुषमा यादगीरे आदींसह मुलीचे आईवडील उपस्थित होते.