मंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? मराठा मोर्चाने बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई,१४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्तावर उतरुन आंदोलन करत आहेत. यासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं आहे. छगन भुजबळ मराठा समाजाची चेष्टा करणारे वक्तव्य करत आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी. अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरं जावं, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.

मराठा समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसंच ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल काळे यांनी मंत्री भुजबळ यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी इशारा देण्यात आला आहे.

अॅडव्होकेट अतुल पाटील यांनी सतीश काळे यांच्या वतीने पाठवलेल्या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहेत. सतीश काळे यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी शहरात आमरण उपोषण केलं होतं. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हे आंदोलन समाज बांधवांना न्याय मिळावा यासाठी सुरु आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मंत्री या पदावर काम करताना या प्रश्नाबाबत छगन भुजबळ गंभीर नाहीत. मराठा समाज बांधवांचे आंदोलन कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नाही. तरी देखील गेल्या काही दिवसांपासून मंत्री भुजबळ मराठा आणि ओबीसी या दोन समुहात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहेत.

१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा कोणत्या पक्ष किंवा नेत्याने आजोजित केलेली नाही. या सभेसाठी कोणीही कसलीही वर्गणी मागितलेली नाही. तसंच कोणतीह प्रयोजन घेतलेलं नाही. ही बाब संपूर्ण राज्याला माहिती असून देखील या सभेबद्दल कुचेष्टा करणारी व मराठा समजाच्या भावाना दुखावणारी वक्तव्य मंत्री भुजबळ यांनी केली आहेत.

त्यामुळे मराठा समाजाची कुचेष्टा करणारी तसंच भावना दुखावणारी केलेली वक्तव्य त्वरित मागे घेऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी सतीश काळेंचे कादेशीर सल्लागार अडव्होकेट अतुल पाटील यांनी या नोटीसद्वारे केली आहे. माफी मागितली नाही तर कादेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील मंत्री भुजबळ यांना देण्यात आला आहे.