हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

मुंबई,१३ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली व महिला हरविल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे. महिला, मुली हरविल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिलेचा कसून शोध घेतात. तपासासाठी आवश्यक पर्यायांचा उपयोग करीत महिलेला शोधून घरापर्यंत आणण्यात येते.

राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभाग कटिबध्द आहे.