फुलचंद भक्कड यांनी गांधीवादी आदर्श जालन्यात रुजविला- प्रा. कुलकर्णी

भारत सेंटरच्यावतीने गांधी जयंती, देशभक्तीपर गीतगायन व गौरव सोहळा

जालना ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-ज्येष्ठ समाजसेवी फुलचंद भक्कड यांनी खऱ्या अर्थाने गांधीवादी विचार व आदर्श जालन्यात रुजविला, असे गौरवोद्गार प्रख्यात विचारवंत आणि व्याख्याते प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी आज सोमवार दि. 2 ऑक्टोंबर रोजी येथे काढले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा एक भाग असलेल्या भारत सेंटर जालना जिल्हा यांच्यावतीने येथील गांधी चमनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त देशभक्तीपर व क्रांति गीतगायन, गांधी विचारावर कार्य करणारे समाजसेवी फुलचंद भक्कड यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी महात्मा गांधींच्या विचाराची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान देताना प्रा. कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर गौरवमूर्ती फुलचंद भक्कड, कार्यक्रमाचे संयोजक मा. सत्संग मुंडे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने, शिक्षक श्री. कराड, लक्ष्मण झरेकर, यांची उपस्थिती होती.

प्रा. कुलकर्णी यांनी पुढे बोलताना माणूस होणे ही प्रक्रिया माणूस आणि जनावर यांच्यामधील आनंदाच्या फरकाच्या संकल्पना वेगवेगळे उदाहरणे देऊन सांगितल्या, जसे की, जनावराच्या आनंदाच्या संकल्पना पोट भरण्याच्या निगडीत असतात व माणसाच्या आंनदाच्या संकल्पना पोट भरण्याच्या निगडीत नसतात, अशी नैतिक उत्क्रांती माणसांची चालू आहे. मतदाराच्या मताची किंमत करु नका हीच लोकशाही व गांधी विचाराची शिकवण असल्याचे त्यांनी सांगून गांधी आपल्या मना-मनांत, घराघरात रुजवायचे व माणूस व्हायचे ठरवा, असा सल्ला त्यांनी दिला. सत्काराला उत्तर देताना फुलचंद भक्कड यांनी सर्वांनी गांधी विचार बाळगावा. गांधी विचारानेच आपण पुढे जाऊ, आपली प्रगती अहिंसात्मक मार्गानेच करू, अशी साद घालून आपण गांधी विचार कसा रुजविला, याबाबत माहिती दिली.
याप्रसंगी श्री. लक्ष्मण झरेकर या शेतकरी बांधवाने महात्मा गांधी यांच्याविषयी विचार मांडतांना अहिंसामधील अ आपण खाल्ला व हिंसा आपली वाढली, असे वास्तव स्पष्ट करून, स्वावलंबी जीवनाचे बोधचिन्ह म्हणजेच अहिंसा. जगाचे आठवे आश्चर्य म्हणजेच गांधी. त्यांचे विचार सर्वांनी आपल्यामध्ये, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी रुजवावेत, ही त्यांची शिकवण घराघरात जावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सत्संग मुंडे यांनी गौरवमूर्ती फुलचंद भक्कड यांनी गांधी विचार समाजामध्ये कसा रुजवला व वाढवला, याची उदाहरणे दिली. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्राप्रसंगी त्यांनी विचाराची प्रासंगिकता, सत्य अहिंसा याची शिकवण व समाज एकरुपता यात्रेप्रसंगी लोकांमध्ये जाऊन दिली, ती रुजवता आली पाहीजे, तसेच संविधाची मूल्य जपली पाहिजेत. सत्य, अहिंसेच्या मार्गाने आपले विचार असले पाहिजेत, आपल्याला आपल्या विचाराचे स्वातंत्र्य जपता आले पाहिजे, असे सांगितले.
प्रारंभी प्रा. सत्संग मुंडे यांनी गौरवमूर्ती फुलचंदजी भक्कड यांचा शाल व पुष्पहार देऊन गौरव केला. त्यानंतर प्रा. बी. वाय. कुलकणा, प्रा. डॉ. सोनुने, देशभक्तीपर व क्रांतीगीत सादर करणारे गायक रवि वाघमारे व संचाचा त्यांनी सत्कार केला. शेवटी एकतेची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. लहूराव दरगुडे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. यशवंत सोनुने यांनी मानले. या कार्यक्रमास जालना शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.