यशवंत सेनेचे चौंडी येथील उपोषण अखेर मागे ; गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश

धनगर बांधवांनी दिली ५० दिवसांची मुदत

अहमदनगर ,२६सप्टेंबर/प्रतिनिधी :-  मराठा आरक्षणानंतर पेटून उठलेल्या धनगर समाजानेही अखेर एकविसाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. आज सकाळीच नगरविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर येथील चौंडी येथे उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व यावर जवळपास मार्ग निघाला आहे, असे सांगितले. त्यानंतर काही तासांतच महाजनांची शिष्टाई यशस्वी झाली असून धनगरांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळेस धनगर बांधवांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. या वेळेचा योग्य वापर करत लवकरच हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन महाजन यांनी दिलं.

गिरीश महाजन म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी सरकार आणि धनगर समाज आरक्षणासंदर्भातील सर्व प्रतिनिधी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात राज्य सरकारने एकमताने धनगरांची मागणी न्याय्य असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला. परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासन अतिशय गंभीर आहे.

पुढे ते म्हणाले, आंदोलनादरम्यान ज्या धनगर समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, ही धनगर समाजाची दुसरी मागणी होती. शासनाने ही मागणीदेखील मान्य केली आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाज आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांनी आम्हाला ५० दिवसांची मुदत दिली आहे. या ५० दिवसांत धनगर आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर कसा मोकळा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं महाजन म्हणाले.

धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत त्यांना आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. धनगर आरक्षणाबाबत कोणतंही ठोस आश्वासन नाही. अगोदर ठोस आश्वासन द्यावं. नाहीतर आम्ही कोणत्या आधारावर उपोषण सोडायचं. त्यामुळे आमचं उपोषण चालूच राहिलं. राज्यात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला जाईल. असं आंदोलक बाळासाहेब दोडतले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटलं.