वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप का नाही ? आढावा बैठकीत खा.जलील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

वैजापूर ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यात झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीची खा. इम्तियाज जलील यांनी काल पाहणी केली.त्यानंतर अधिकाऱ्यांबरोबर  आढावा बैठक घेऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्यांना मदत करण्याबाबत सूचना दिल्या.तालुक्यातील शिऊर, खंडाळा,वाकला व तलवाडा आदी भागात खा.जलील यांनी पाहणी दौरा केला.त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली.

तालुक्यातील काही गावांना मी भेटी दिल्या असता अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेत जमिनीही वाहून गेल्याची परिस्थिती पहावयास मिळाली.जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे परंतु वैजापूर तालुक्यात अद्यापही नुकसानीचे पंचनामे का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित करून खा.जलील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.या आढावा बैठकीत नागरिकांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा, आरोग्य व स्वस्त धान्य दुकानांसंदर्भात  मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या.सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व समस्या मार्गी लागल्या पाहिजे, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगून ख.जलील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.या आढावा बैठकीस मा.आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिलसेठ, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, तहसीलदार राहुल गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे,एमआयएमचे तालुकाध्यक्ष अकिल कुरेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.