पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 91 कोटी – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

परभणी ,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करताना परभणी जिल्ह्याचे योगदान अनन्यसाधारण असून, राज्य शासन जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याला भरघोस निधी देण्यात आल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय जाधव, आमदार  डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या पिढीला मुक्त‍िसंग्रामाचा लढा कळावा म्हणून, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून हे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात येत आहे. देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने सामील होण्यास तयार नव्हती. त्यामुळे निजामाविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारला होता. त्यानंतर 13 महिन्यांनी हा भाग मुक्त झाल्याचे श्री. सावे म्हणाले.

हैदराबाद मुक्तीसंग्रामात परभणीकरांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. कारण निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध प्रत्यक्ष संघर्षाची मुहूर्तमेढ ही परभणी जिल्ह्यातच रोवली गेली होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामात महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे.  या लढ्यात परभणी जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान दिले. या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. या लढ्याचा मुख्य हेतू हा राष्ट्रीयता, निधर्मीपणा व लोकशाहीची भावना वाढविणे हा होता, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्त‍िसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा विभागाचा कायापालट घडविण्यासाठी तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांची विकास कामे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 91 कोटी 80 लाख, जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करुन 400 मुलींना शिक्षण घेण्यासाठी 20 कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा व क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणासाठी 15 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

परभणी शहराची वाढती लोकसंख्या पाहता समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 157 कोटी 11 लाख रुपये तसेच शहरासाठी मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 408 कोटी 83 लाख मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी येथील नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता महानगरपालिकेस 11 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. सेलू तालूक्यातील निम्न दुधना प्रकल्प आणि पुर्णा तालूक्यातील ममदापूर उच्च पातळी बंधारा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या कामास 728 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाद्वारे परभणी व जालना या दोन जिल्ह्यातील एकूण 34 हजार 438  हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तर ममदापूर उच्च पातळी बंधाऱ्यासाठी 271 कोटी 87 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील 1  हजार 375 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच मराठवाड्यातील पुरातन मंदिरांच्या विकासकामांसाठी तब्बल 253 कोटी 70 लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर, धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिरासह चारठाणा मंदिर समूहाचे संवर्धन आणि विकास करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात जिल्ह्यातील 8 लाख 75 हजार लाभार्थ्यांना 1 हजार 464 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे लाभ दिल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबविले जात आहे. आता ‘आयुष्मान भव’ ही योजना राबविण्यात येत असून, राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले आहे. या योजने अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान व आरोग्य मेळावे, रक्तदान शिबिर, अवयव दान जनजागृती, आयुष्यमान ग्राम सभा, अंगणवाडी – प्राथमिक शालेय मुलांची आणि 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी असे विविध आरोग्य विषयक कार्यक्रम या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, वारस यांची भेट घेतली. तसेच विष्णू रामभाऊ वैरागड यांनी दिव्यांगाच्या पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, तहसीलदार यांच्यासह पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सहकार मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवत तसेच हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी श्री. सावे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 120 फूट उंच ध्वजस्तंभाचे अनावरण

महानगरपालिकेने राजगोपालचारी उद्यानात उभारलेल्या 120 फूट उंच स्तंभाचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परभणी मनपाने प्रथमच 120 फूट उंच राष्ट्रध्वजासाठी हा स्तंभ उभारला आहे. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.

येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रिटीश कालावधीत प्रथम परभणी जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) आवृत्ती सन 1967 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याच गॅझेटिअरची पुरवणी सन 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून त्याचे पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या परभणी जिल्हा मराठी गॅझेटिअरला 32 वर्ष झाल्याने याच जिल्हा गॅझेटिअरची पुरवणी काढून अमुलाग्र बदलांची संक्षिप्ताने नोंद घेवून मागील तीन दशकात लोककल्याणकारी गतिमान शासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विविध योजना व केलेल्या कामांचा आढावा घेणारी पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विशेष कामांची जाणीवपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. ही पुरवणी म्हणजे नवीन ग्रंथ नसुन सांख्यीकीय तक्त्यांच्या आधारे मूळ ग्रंथातील नोंदीनंतरचा टप्पा नोंदविण्यात आला आहे.

परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीसाठी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या मार्गदर्शनात सहसंपादक श्रीमती सा.प्र. पिंपळे, संशोधन अधिकारी दि. वि. भगत, सहायक संशोधन अधिकारी श्रीमती स.सु. गोसावी आणि लघुलेखक वि. प. गुळगुळे यांनी मर्यादित वेळेत काम करुन ही आवृत्ती प्रकाशित केली आहे.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ चित्रप्रदर्शनीला मंत्री श्री. सावे यांची भेट

 मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर येथे परभणी शहरातील जिजाऊ आयटीआयच्या वतीने ‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाला भेट देत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे, माजी खासदार सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या चित्रप्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे नाव, मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे गृहनिर्माण, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांना जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. नितीन लोहट, कार्यक्रम समन्वयक सिद्धेश्वर जाधव उपसि्थत होते.