गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर,१६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटीबध्द असून समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील एक वर्षात शासनाने सुमारे 112 कोटी रुपये गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दिले असल्याचे, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

            शहरातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवनिमित्त आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडयाच्या विकासासाठी 46 हजार कोटीहून अधिक विकास कामांना मान्यता देण्यात आली. मराठवाडयाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पश्चिमी भागातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार मिळाले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजनेमध्ये रुपये पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने चिंता करु नये. सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे हे शासन आहे.

दरम्यान, जालना जिल्हयातील अंतरवाल सराटी येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या काही रुग्णांवर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांनी जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली.