सुखमनी साहेबच्या 40 पाठांची सांगता !

चढदीकला सेवक जत्थाच्या महिलांचा भक्तिभाव 

Displaying 20210831_122818.jpg

नांदेड,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- येथील चढदीकला सेवक जत्था तर्फे शीख पंथावरील व्याप्त संकट टळावे व होळी सणाच्या वेळी अटक झालेल्या सर्व लोकांना त्वरित जामीन व न्याय मिळावा या भावनेने मागील चार महिन्यापासून शीख समाजातील महिला नियमितपणे सुखमनी साहेब या गुरुबाणीचे पाठ श्रद्धाभावाने  करीत होत्या. मंगळवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 12.30 वाजता दरम्यान अशा चाळीस पाठांची धार्मिक रीतिया सांगता (समाप्ती) तखत सचखंड समोर गेट नंबर एकच्या ढेवडी प्रवेशद्वार येथे करण्यात आली.

यावेळी गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीतग्रंथी कार्यकारी भाई जगिंदरसिंघजी सुखाई, माजी मीतग्रंथी भाई अवतारसिंघजी शीतल, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले, संतबाबा तेजसिंघजी मातासाहेबवाले, गुरुद्वारा अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक शरणसिंघ, माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुखमनी साहेब, चौपाई साहेब, आनंदसाहेब, कीर्तन व अरदास करण्यात आले.

चढदीकला सेवक जत्थाच्या वतीने गुरुप्रसादकौर पिता लालसिंघ गाडीवाले, नानककौर जोगिंदरसिंघ सुखाई, नीलमकौर राजिंदरसिंघ पुजारी, प्रीतमकौर देविंदरसिंघ महाजन, महिंदरकौर राजेंद्रसिंघ चावला, हरबंसकौर कश्मीरसिंघ, सुरजीतकौर बलबीरसिंघ लांगरी, हंसराजसिंघ राजेंद्रसिंघ लांगरी, गुरदेव कौर पाठी व इतर महिलांनी धार्मिक कार्यक्रम पार पाडले. अरदास उपरांत प्रसादाचे वाटप करण्यात आले. होळी सणाच्या वेळी घडलेल्या अप्रिय घटनेनंतर शीख समाजातील लोकांना वर पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. त्यात अनेक निर्दोषांनाही गोवण्यात आले. तसेच पाच महिन्यापूर्वी अटक झालेल्या लोकांना अद्यापही जामीन मिळत नाही आहे. शीख समाजावरील संकट टाळावे व लोकांना न्याय मिळावा अशी प्रार्थना या वेळी गुरु महाराजापुढे करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखनसिंघ लांगरी, स. लड्डूसिंघ काटगर, स. कश्मीरसिंघ भट्टी, मनप्रीतसिंघ ग्रंथी व इतरांनी  परिश्रम घेतले.