मनोहर जोशींचे घर जाळायचे आदेश उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे-शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : ‘मनोहर जोशी यांच्या घरी जाताना वाटेत पेट्रोल पंप लागतो तेथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे संजय राऊतांनी फोन करुन सांगितले होते. त्यामुळे मातोश्रीचा आदेश आम्ही पाळला’, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. शिवसेनेच्या कोल्हापूरमधील मेळाव्यात बोलताना आमदार सदा सरवणकर यांनी तेव्हा आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावल्याचा आरोप केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या गैरकारभाराची पोलखोल होत आहे.

सदा सरवणकर यांनी जाहीर कार्यक्रमात घडलेला घटनाक्रम सांगताना म्हटले की, आमच्या आयुष्यातील गुरु मनोहर जोशी होते. ज्यावेळी मला उमेदवारी नाकारली तेव्हा मी मनोहर जोशींना काय करु, असं विचारलं. जोशी म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागेल. ‘मातोश्री’वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी ‘मातोश्री’वर गेलो. उद्धव ठाकरे बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत.

सरवणकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे तिथून निघून गेले. मिलिंद नार्वेकर तिथे होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी कापलेलं आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो. थोडं पुढे गेलो तेव्हा संजय राऊतांचा फोन आला. मला म्हणाले कुठे चालले? त्यांना कशाला सांगायचं त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं दिली. सेना भवनाला चाललो वगैरे. ते म्हणाले, तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस.

”मातोश्री’चा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे मी मनोहर जोशींच्या घरी निघालो. तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात. घराच्या आजूबाजूला काही व्हिडीओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. मला प्रश्न पडला मला याठिकाणी येण्यासाठी एक तास लागला तोपर्यंत एवढी तयारी कशी झाली? तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून पुढे गेलो आणि त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती आहे.

जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम ठाकरेंनी केले

सदा सरवणकर पुढे म्हणाले की, त्यानंतर दुपारी मिलिंद नार्वेकरांनी दुपारी फोन करुन चांगलं काम केल्याचे सांगत उमेदवारी निश्चित असल्याचे म्हणाले. दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मातोश्रीवर येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे समोर होते. संजय राऊत सुद्धा होते. त्यांनी माझ्यासमोर पेपर फेकून हे पेपरात काय आलंय बघ म्हणून दाखवले. आमदार सदा सरवणकरांनी मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केल्याचा बातम्या होत्या.

मी त्यावेळी म्हणालो की, मला आदेश देण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले एवढं सगळ करुन तू निवडून कसा येणार? तुम्ही सांगितल्याने मी हे सर्व केलं आहे. मी निवडून येऊन दाखवेन. त्यांनी निवडून येत नसल्याचे सांगत पेपर बाजूला केला आणि निघून गेले. जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केलं नाही. असं हे कद्रू नेतृत्व असल्याने शिंदे यांनी उचललेले पाऊल शंभर टक्के बरोबर आहे, असं प्रतिपादनही सरवणकर यांनी केलं. सरवणकरांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.