लातूर जिल्ह्यात टीकावू रस्त्याचे नवतंत्रज्ञान जळकोट तालुक्यात प्रथमच

सी.टी.डी तंत्रज्ञानातून होणार 40.26 कि.मी. लांबीचा रस्ता

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

खा.सुधाकर शृंगारे यांच्याही हस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचे झाले भूमिपूजन

लातूर,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-रस्ते अधिक काळ टिकण्यासाठी सी.टी.डी. नवतंत्रज्ञानाचा देशात वापर सुरु झाला आहे. या तंत्रज्ञानाने जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जळकोट तालुक्यातील जिरगा मोड ते कुणकी -हाळद वाढवणा ते रावणकोळा या 14 किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार असून या कामाचे भूमिपूजन आज राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व खा.सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी आमदार गोविंद केंद्रे, जळकोटच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, रामराव राठोड, प्रा. शाम डावळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जळकोट तालुक्यातील आज ज्या रस्त्याचे पंतप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत भूमीपूजन झाले. तो रस्ता अत्यंत खराब होता, पण त्याचे इस्टीमेट मध्ये चुका झाल्यामुळे रस्ता करायला उशीर झाला. पण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर जिल्ह्यात होणारा हा पहिला रस्ता आहे. हे नवे तंत्रज्ञानामुळे जुन्या रस्त्याचा माल वापरून लिक्विड बेस अत्यंत टीकावू रस्ते तयार होतात. त्यामुळे जिल्ह्यातील या तंत्रज्ञानातून होणारा पहिला रस्ता त्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सडक योजनेतील कामांना 60 टक्के निधी केंद्र सरकारचा आणि 40 टक्के निधी राज्य शासनाचा असतो. त्यासाठी राज्यस्तरावर आम्ही पाठपुरावा करतो, तर केंद्र स्तरावर खासदार सुधाकर शृंगारे पाठपुरावा करतात. यापुढे जिल्ह्यात अधिकाधिक रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करू, असेही मंत्री ना. बनसोडे म्हणाले.

जळकोट तालुक्यात सिंचनासाठी बॅरेजस, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, नवीन प्रशासकीय इमारत ही सर्व कामाचे पूर्ण झाली असून थोड्याच दिवसात याचे लोकार्पण करू, असेही यावेळी श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

लातूर जिल्ह्यात 165 किलोमीटरचे रस्ते आपण प्रयत्नपूर्वक मिळविले असून हे रस्ते अत्यंत गुणवत्तापूर्वक करावेत. यात कोणताही दोष निघाला तर खपवून घेणार नसल्याचे सांगून जिल्ह्यातील कोणतेही काम केंद्रात असेल तर आपल्याला सांगावे ते काम आपण प्रयत्नपूर्वक करू, असे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.

जळकोटमधील गणपती मंदिर, शादी खाण्यासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.