साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदगीर दौरा ऐनवेळी रद्द

माधव मठवाले 

उदगीर ,२१ एप्रिल :-उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडाच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयाच्या सुमारे ३६ एकरच्या परिसरात संमेलन साजरे होत आहे.

या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथिदिडीने होणार असून यंदाच्या ग्रंथदिंडीची तीन खास वैशिष्टय़े आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या एका ग्रंथदिंडीचे नेतृत्व दुचाकीवर स्वार असणारे महिलांचे पथक करणार आहे. या पथकात घोडेस्वारी करणाऱ्या महिलाही असणार आहेत. ग्रंथिदिंडीचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ‘गुगलविधी’ असून कर्नाटकातील ‘गुगल’ नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्यात येते. हा विधी ग्रंथिदडीत अनुभवायला मिळणार आहे.

मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी ‘नवरंग’ दिंडी हे तिसरे वैशिष्टय़ असणार आहे. पाचशे  शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. यासह ढोल, लेझीम, वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे १५० कलावंत ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत.

उदगीरचे महाराष्ट्र उदगीर महाविदयालय पूर्णपणे शहरात आणि त्यांच्या महाविद्यालयात होणाऱ्या या अखिल भारतीय साहित्य  सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी एक दिलाने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत .महाविद्यालयातील सर्व विभागाची प्राध्यापक मंडळी आपल्या विद्यार्थ्याना घेऊन या साहित्यिक सांस्कृतिक सोहळयाला एक वेगळे आयाम देण्यास तत्पर झाले आहेत . काल झालेल्या अजय अतुल नाईट ला  रसिकांनी मोठी  गर्दी केली होती आज रात्री ” चला हवा येऊ द्या ” चा प्रयोग पूर्णपणे फसला. हा कार्यक्रम रंगला नाही. 

लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, ते सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी करु असा विश्वास या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलनाचे वेगळेपण

या साहित्य संमेलनाचे अनेक अर्थांनी वेगळेपण दिसून येणार आहे. कर्नाटक, तेलंगणा सीमेवर भरणाऱ्या या साहित्य संमेलनात सीमावर्ती जिल्ह्यातील लोक सहभागी होणार आहेत. तसेच बाल साहित्यिकांना मोठा वाव देण्यात आला आहे. पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या मंचावरून या देशाचाच नव्हे तर जगाचा अत्यंत ज्वलंत अशा पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोधर मावजो यांच्यासह माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती या संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली.

या साहित्य संमेलनामुळे लातूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित होणार आहे. हा जिल्ह्यासाठी महत्वाचा उत्सव असणार आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी व्हावं यासाठी आम्ही जिल्ह्याचे सर्व आमदार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदगीर दौरा अखेर रद्दच

९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार होते. मात्र, आता राष्ट्रपती कोविंद हे २४ एप्रिल रोजी व्हिडीओच्या माध्यमातूनच संदेश देणार आहेत. यासंदर्भातील माहिती राष्ट्रपतींचे खासगी सचिव पी. प्रवीण सिद्धार्थ यांनी मराठवाडा एज्युकेशन सोसायटी संचलित उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदगीर दौरा अखेर रद्दच झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यासंदर्भात प्रवीण सिद्धार्थ यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये काही टाळता न येणाऱ्या कारणांमुळे राष्ट्रपती संमेलनात उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या कामामुळे राष्ट्रपतींना येता येणार नसल्याचं देखील या पत्रात नमूद केलं आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन

भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही रसरशीत राहावी, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक असतो, लेखक आणि त्याची लेखणी. लेखकाची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात पर्यावरण-अभ्यासक अतुल देऊळगावकर, साहित्याचे अभ्यासक दिलीप चव्हाण, शिक्षण-अभ्यासक हेमांगी जोशी, नाटककार राजकुमार तांगडे, अनुवादक सोनाली नवांगुळ, पत्रकार हलिमाबी कुरेशी आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे संवादक मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार आहेत.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल २०२२ रोजी सायं ५ वा. आयोजित सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून आणि फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट  प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

या संमेलनात मतदारांच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने, मतदार नोंदणी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा-महाविद्यालये, गावा-परिसरामध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकांही या दालनात उपलब्ध असतील.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार संपादित ‘लोकशाही समजून घेताना’ हे ५४५ पृष्ठांचे पुस्तक अवघ्या १५० रुपये या सवलत दरात उपलब्ध असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरीने विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावेत; तसेच नव्याने पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपजिल्हाधिकारी ( निवडणूक ) डॉ. सुचिता शिंदे उपस्थित होत्या.