शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतील अग्रीम अनुदान द्या-आ.सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  जिल्ह्यात पावसाचा सलग 21 दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

          यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.1) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील पावसाअभावी खरीप खंगाम 2023 मधील सद्यपरिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगांव, पैठण, फुलंब्री व इतर तालुक्यात जुन-जुलै-ऑगस्ट 2023 दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतील मिडसिझन ऍडव्हर्सिटीअंतर्गत 25 टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात देण्याची तरतूद आहे. यासाठी पावसाचा 21 दिवसांचा खंड असावा अशी अट आहे. सदरील शासन निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगांव, पैठण, फुलंब्री व इतर तालुक्यात जुन-जुलै-ऑगस्ट 2023 दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले.

          त्यामुळे सदरील शासन निर्णयानुसार विमाधारक शेतकर्‍यांना पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. अजितदादा पवार यांनी देखील आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यांसदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.