मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘इंडिया’ आघाडीला इशारा ; म्हणाले, “आगीशी खेळू नका, महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा

शिर्डी ,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :-देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. यात देशभरातील २८ विरोधी पक्षांच्या नेत्यांची हजेरी लागणार आहे.आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रातल्या मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला गलावला आहे. यावेली आगीशी खेळू नका, अख्खा महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा असल्याचं शिंदे म्हणाले.

आज (३१ ऑगस्ट) देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात शिर्डीत साई बाबांच्या दर्शनाने केली. यानंतर लोणी येथे आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास हजेरी लावत विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या कलावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी संरक्षणमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधला.

यावेली बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एका माणसाच्या विरोधात एवढे लोक एकत्र आले आहेत. त्या फोटोत चेहरे सुद्दा नीट दिसत नाहीत. महाभारतात कोणाचा पराभव झाला हे लक्षात असू द्या. असं म्हणत कोणीच मोदींना हरवू शकत नाही, असंचं एकप्रकारे मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील याची देखील खात्री त्यांनी दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील यावेळी विरोधकांच्या आघाडीवर निशाणा साधला. आज विरोधी पक्षांची बैठक असली तरी त्याचा उपयोग होणार नाही. नाव मोठं आणि लक्षण खोटं असं म्हणत राजनाथ सिंहांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, इंडिया(INDIA)नाव घेऊन नौका पार होत नाही, कर्म पाहिजे. असा सल्ला राजनाथ सिंह यांनी दिला. जनतेचा पाठीशी असल्याचंही ते म्हणाले.