राजकारणी लाचार आणि पैशासाठी वेडे झालेत!-मनसेच्या सहकार शिबिरात राज ठाकरे यांनी व्यक्त केले परखड मत

कर्जत : आजचे राजकारणी लाचार झालेत, मिंधे झालेत. पैशाने वेडे झालेत. त्यांच्या पाठिला स्वाभिमान नाही, काही नाही. इकडून तिकडे जात आहेत. घरचे लोक देखील त्यांना विचारत असतील आज कोणत्या पक्षात आहात. या लोकांनी आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे. मनसेकडून कधीही स्वाभिमान गहाण ठेवला जाणार नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मनसेचे सहकार शिबिर कर्जतमध्ये पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. महानंदा डेअरी भविष्यात अमूल गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची स्थिती पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाहीl, असेही राज ठाकरे म्हणाले.

शिवडी न्हावा शिवा ब्रिज झाला आहे. पण, अशाप्रकारच्या ब्रिजमुळे आपल्या लोकांच्या हातून फक्त जमिनी गेल्या आहेत. उद्या आपल्या हाती रायगड जिल्हा देखील राहणार नाही. विमानतळ बनतेय, सर्व बाहेरचे लोक येऊन हे नाकावर टिच्चून बळकावणार. एकदा ते आले की त्यांना हुसकावता येणार नाही. काही काळाने तर आपण मराठी भाषा देखील विसरून जाऊ. त्यामुळे सतर्क व्हा. ही महाराष्ट्रातल्या विरोधातील सहकार चळवळ सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

काही धोक्याचा सूचना मला द्यायच्या आहेत. आपल्याला इतिहासाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गोष्टी एकदा हातातून निघून गेल्यावर काहीही होणार नाही. मराठवाड्यातील विहिरीला ८०० ते ९०० फुटापर्यंत पाणी लागत नाहीये. अशी मराठवाड्यात परिस्थिती आहे. राजकारणामुळे मराठवाड्यात साखर कारखाने उभारले जात आहेत. अशीच स्थिती राहिली तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

भविष्याचा कोणताची विचार राजकारण्यांकडे नाही. वाळवंट झालेली जमीन पूर्ववत करायची असेल तर चारशे ते पाचशे वर्ष लागतील, असे तज्ज्ञ सांगतात. नुसते जातीजातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. मराठी लोकांनी एकत्र राहू नये यासाठी बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरु आहेत. पण, हे आपल्या लोकांना कळत नाहीत. जे चांगलंय ते घेऊन जा किंवा उद्धवस्त करा असे बाहेरचे लोक करत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

आतापर्यंत जे युद्ध झाली त्याला इतिहास म्हटले जाते. कोणताही इतिहास जमिनीशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमीन मिळवणे. जमीन मिळवणे म्हणजे युद्ध करणे. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे की आपल्या लोकांच्या जमिनी हळूवारपणे, कळू न घेता बळकावल्या जात आहेत, असे ते म्हणाले.