फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही-भाजपा आ. प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना  इशारा

मुंबई,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :-मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले की, हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत असभ्य भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. तुम्ही  आरामासाठी परदेशात गेला होता.  कोवीड काळात भ्रष्टाचाराने कलंकित झालेल्या उद्धव ठाकरेंना  निष्कलंक देवेंद्र  फडणवीसांवर टीका करण्याचा हक्क नाही. सत्ता हातून गेल्याच्या वैफल्यातून  भ्रमिष्ट झालेले उद्धव ठाकरे बाष्कळ आरोप करत आहेत.  

          उद्धव ठाकरेंना राज्य आणि देशाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री असताना ते केवळ घरच्यांच्या विकासात रममाण होते.केंद्राच्या लोकहितार्थ योजना कुठल्या हे देखील माहिती नसणारे उद्धव ठाकरे, ”उचलली जीभ लावली टाळ्याला” या उक्तीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतात. शिवसेनेसाठी आपल्या घराची राखरांगोळी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण काय दिले हे उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावे. कोणत्याही कोट्या आणि टीका न करता ठाकरे यांनी सलग एक तास केवळ विकासावर बोलून दाखवावे असे आव्हान श्री. दरेकर यांनी दिले.

श्री. दरेकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले. शिंदे – फडणवीस – पवार सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा अव्वल स्थानावर गेला आहे.