शरद पवारांचा यूटर्न! म्हणतात ‘मी तसं म्हणालोच नाही!’

दादा पुन्हा येणार का, यावरही व्यक्त झाले काका…

सातारा : ‘अजितदादा आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही’, असं विधान करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी खळबळ उडवून दिली होती. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. परंतु काही तासांतच त्यांनी पत्रकार परिषद घेत ‘मी तसं म्हणालोच नाही!’ असा खुलासा केल्याने अन्य नेतेमंडळी तोंडावर आपटली आहेत.

बारामतीत आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेल्या ‘अजितदादा आमचेच नेते आहेत’ या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी देखील काल याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलेले असताना अवघ्या काही तासांतच शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावरुन यूटर्न घेतला आहे. साताऱ्यात बोलताना सकाळच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत, मी तसं बोललोच नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी काल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्यामुळे बहिण भावांच्या नात्यात सहजपणे बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार स्वगृही परतणार का या प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते. सध्या आमची भूमिका दुसरी आहे, असं पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

कोल्हापूरातील सभेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांना फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्याचं काम हाती धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या सभेचं कोल्हापूरात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मंत्री हसन मृश्रीफ यांच्यावर टीकेची झोळ उठवली. सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरु आहे. कोल्हापूरच्या एका नेत्याच्या घरी ईडी, आयकरने धाडी टाकल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या घाला पण असा छळ नको असं बोलण्याचं धाडस दाखवलं. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही. ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले, अशा शब्दात शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.

आज (25 ऑगस्ट) कोल्हापूरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी भाजपसह अजित पवार गटात गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलीच टीकेची झोळ उठवली. सत्तेचा गैरवापर कुणी केला? तरुणांना बिघडवलं कुणी? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

देशमुख राऊत यांच कौतूक तर मुश्रीफांना फटकारलं

राष्ट्रावादी काँग्रेसमधील काही आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी बंड केले. यानंतर शरद पवारांची कोल्हापूरात पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवारांनी बंडखोर नेत्यांना चांगलचं फटकारलं. यावेळी पवार म्हणाले की, अनिल देशमुख स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांनी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली. पण केवळ त्रास देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकलं. सामनाचे संपादक संजय राऊत भाजपवर टीका करत असतात त्यांनाही लिखाण बंद करण्याची धमकी दिली. ते जुमानले नाहीत तर त्यांना देखील तुरुंगात टाकलं. नवाब मलिक यांना देखील तुरुंगात टाकलं. भाजपला वाटलं आम्ही या सगळ्याला घाबरलो. मला ईडीची नोटीस आली होती. मी म्हटलं उद्या नाही तर आता येतो. सगळे पोलीस घरात येऊन बसले आणि येऊ नका म्हणाले. प्रत्येकानं असं केलं पाहीजे. आपण काही केलं नाही तर घाबरुन जाऊ नये. असं पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार गटात सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे. काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीला सामोरं जातील. घरातील भगिनींनी सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला. पण कुटुंब प्रमुखाने तसं म्हटलेलं ऐकलं नाही. जी भूमिका त्या घरातील भगिनीने घेतली ती त्या प्रमुख नेत्याने घेतली नाही. ते भाजपसोबत सत्तेच जाऊन बसले, असं शरद पवार म्हणाले.