बाल साहित्यिक धोंडिरामसिंह राजपूत यांच्या “वाट” या कविता संग्रहाचे लहू कानडे यांच्या हस्ते प्रकाशन

वैजापूर,२२ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर येथील जेष्ठ बालसाहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या “वाट” या कविता संग्रहाचे श्रीरामपूरचे प्रसिध्द कवी व थोर साहित्यिक आ.लहू कानडे व पंचायत समितीच्या सभापती डॉ,वंदना मुरकुटे यांच्या शुभहस्ते श्रीरामपूर येथे साहित्यिक सन्मान सोहळ्यात प्रकाशन झाले. 
“वाट” या कविता संग्रहातील कविता या भरकटलेल्या युवा वर्गाला निश्चित ‘वाट दाखवतील असे उदगार कवी आ.लहू कानडे यांनी काढले.समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता या कविता संग्रहात असल्याचे ते म्हणाले. पंचायत समितीच्या सभापती डॉ,वंदना मुरकुटे यांनी भाष्य करताना सांगितले की, या  काव्यसंग्रहातील कविता समाज आणि  पर्यावरणातील विषयांना चालना देणाऱ्या असून, त्या लोकप्रबोधनासाठी व कृतीत उतरविण्यासाठी महत्वाच्या आहेत.

धोंडीरामसिंह राजपूत यांचे हे 35 वे पुस्तक आहे. या आधी त्यांनी शेतकरी, महिला, सामाजिक विषय व बाल विषयावर विपुल लेखन केलेले आहे. फुले – शाहू व  आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक सामाजिक विषयावर त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेले आहे.