छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारक विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

  • स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करावा- उपमुख्यमंत्री
  • राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरु स्मारक विकासाचाही आढावा

पुणे,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करताना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. हुतात्मा राजगुरु यांचे राजगुरूनगर येथील स्मारकही भव्य आणि प्रेरणादायी होईल असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधीस्थळ वढू बु. (ता. शिरुर) स्मारक विकास आराखडा, हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखडा राजगुरुनगर (ता. खेड) तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आरखड्याबाबत माहिती घेतली.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारकाच्या 269 कोटी 24 लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील विकासासाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. या आराखड्यात 3 डी प्रोजेक्शन, मॅपिंग, होलोग्राफी, मोशन सिम्युलेशन आदी अत्याधुनिक संकल्पनांचा वापर करुन महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सादरीकरणाला एक प्रकारचा जीवंतपणा येणार आहे.

स्मारकांच्या उभारणीमध्ये  दगडी कातीव, कोरीव बांधकाम, बीड जिल्ह्यातील मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकात 253 कोटीचा आराखडा असून जन्मखोली, थोरला वाडा आदी भाग पुरातत्व विभागाकडून तर संग्रहालय, तालिम, वाचनालय आदी भाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार आहे. यामध्येही  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक बांधकाम शैलीचाही  सुयोग्य वापर करावा, अशाही सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

स्मारकांच्या विकासातील बारकावे समजून घेत उपमुख्यमंत्र्यांनी विविध सूचनाही दिल्या. नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनच्या आराखड्याचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. ऑलिम्पिक म्युझियम, क्रीडा आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कार्यालय तसेच व्यावसायिक वापरासाठीची कार्यालये असे भव्य आणि वैविध्यपूर्ण बांधकाम यात समाविष्ट आहे असे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करावी, भरपूर प्रकाशव्यवस्था करावी तसेच इमारतीच्या छतावर सौर पॅनेलद्वारे वीजनिर्मितीची तरतूद करावी आदी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.