छत्रपती संभाजीनगर जालन्यासह राज्यात १० जिल्ह्यात पाणीटंचाई 

टंचाईग्रस्त संभाव्य गावांतील कामे अभियान स्तरावर करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई,२४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-सध्या राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दहा जिल्ह्यांतील 350 गावे आणि 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावे व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे अभियानस्तरावर सुरू करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

टंचाई कालावधीत करावयाच्या  उपाययोजना बाबतीत आढावा बैठक मंत्रालयात आज घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशनचे दहा जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते. तसेच दहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील दहा जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत. या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेऊन टंचाई संदर्भात पुढील उपाययोजना करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे.

पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे जेणेकरून पुढील टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल, असे पाहावे. भविष्यात लागणाऱ्या टँकरसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. टंचाई सदृश गावात जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले .

राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांतील सध्या 350 गावांत आणि 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.