मालाड दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू,दहिसर मध्ये मोठी दुर्घटना, 3 घरं कोसळली

मुंबई ,१० जून /प्रतिनिधी:- 

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली.

मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ आता दहिसरमध्येही 3 घरं कोसळल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चव्हाण चाळ शंकर मंदिराजवळ केतकीपाडा दहिसर पूर्व या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. घराखालची माती सरकल्यामुळे 3 घरं कोसळली. यात प्रद्युम्न सरोज नावाच्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जखमींची विचारपूस

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते.  मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयात हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

मालाड मालवणी इमारत दुर्घटनास्थळाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

मालाड मालवणी इमारत दुर्घटनास्थळाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

 मालाड मालवणी येथे काल रात्री इमारत कोसळून 11 जण मृत्युमुखी तर 8 जण जखमी झाले.  घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्याचा आढावा घेतला.

मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. शेख यांनी काल रात्रीच मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आज दुपारी श्री. शेख यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त इमारतीतील निवासी तसेच स्थानिकांशी संवाद साधला. या दुर्घटनेबद्दल श्री. शेख यांनी तीव्र शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी जखमी रहिवाशांच्या परिजनांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अस्लम शेख यांनी काल रात्रीच पालिका आयुक्तांशी चर्चा केली व मदत तसेच बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते.