ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस

मुंबई,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :-पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यंदा आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे.

साधारण १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमे देखील  आली.  परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत असे सांगताना माध्यम जगातील  क्रांतीनंतर देखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

पत्रकार समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी  व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे.  या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीविषयी वृत्तपत्रामध्ये बदनामीकारक बातमी छापली तर त्या व्यक्तीला मोठा मनस्ताप होतो. अशा मनस्तापाचा आपण स्वतः अनुभव घेतला आहे असे त्यांनी सांगितले. खोट्या बातमीमुळे आंदोलने होतात, जाळपोळ व हिंसा होते. त्यामुळे पत्रकार म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांनी अनुसूचित जाती, आदिवासी, मागास वर्गीय, दिव्यांग, अल्पसंख्याक, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्याने स्थान दिल्यास माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील, असे राज्यपालांनी सांगितले.

विजय वैद्य यांना देण्यात आलेला ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो मानवी चेहऱ्यासह पत्रकारितेच्या मोठ्या परंपरेचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  विजय वैद्य यांनी पत्रकारितेला व्यापक समाजसेवेचे माध्यम बनवले. त्यांच्याकरिता पत्रकारिता अंतिम ध्येय नव्हते तर देशातील सामान्य माणसांचा आवाज सरकार दरबारी  पोहोचविण्याचे ते एक साधन होते, असे त्यांनी सांगितले.  एक व्यक्ती आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो याचे विजय वैद्य हे उत्तम उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला याचा अतिशय आनंद झाला असे विजय वैद्य यांनी सत्काराला दिलेल्या उत्तरात सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर विष्णू सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.