राज्यात हुडहुडी वाढणार

मुंबई ,२० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-

राज्याच्या तापमानात पुढील दोन दिवसांमध्ये घट होणार असून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच उत्तरेकडून येत असलेल्या गार वाऱ्यांमुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात वेगाने घट होत आहे.

त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हुडहुडी वाढणार आहे. राज्यात थंडीचा जोर वाढत चालला असून पुढील काळात आणखी नीचांकी तापमानांची नोंद होणार असून राज्यात हाड गोठवणारी थंडी असणार हे निश्चित मानले जात आहे.राज्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. खरंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. मात्र, महाबळेश्वर पेक्षाही राज्यातील जळगाव शहरात नीचांकी तापमान होते. जळगावमध्ये काल १०.३अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर पुण्यात ११.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल नाशिक आणि पुण्याच्या तापमानाची नोंद समोर आली आहे. त्यानंतर अहमदनगर मध्ये ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.