पुण्यातील नवले पूल अपघातात तब्बल ४८ गाड्या एकमेकांवर आदळल्या!

पुणे , २० नोव्हेंबर /प्रतिनिधी :-गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसून येत होतं. अशातच आता रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तब्बल 30 ते 40 गाड्यांचं नुकसान झालंय. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर 25 ते 30 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर ऑईल सांडल्याचं दिसतंय. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.नवले पुलावरील या भीषण अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. सिंहगड आणि दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.

नवले पुल झालाय अपघाताचा सापळा

नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही. यापूर्वीही अनेकदा असे अपघात घडले आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न या निमित्ताने पुणेकर विचारू लागले आहे.

अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई : पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे.
हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत