ॲमेटी विद्यापीठातील कामगारांच्या अडचणींसंदर्भात सहसंचालकांमार्फत चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ॲमेटी विद्यापीठातील स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहसंचालक यांच्या मार्फत चौकशी करण्याचे निर्देश उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील भाताण येथील ॲमेटी विद्यापीठातील कामगारांच्या अडचणी आणि विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या विद्यापीठाला स्वायत्तता असली तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठांनी काम केले पाहिजे. विद्यापीठाने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हितासाठी काम करावे, कर्मचाऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उच्च  शिक्षण सहसंचालक  यांच्यामार्फत चौकशी करून कालमर्यादेत अहवाल सादर करावा.

बैठकीत विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आणि मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या हितासाठी शासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. या बैठकीला आमदार महेश बालदी, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे व अधिकारी उपस्थित होते.