सर्वांच्या सहकार्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकासपथावर नेऊ – पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातून जिल्हा विकासपथावर नेऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, म.न.पा. आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,  पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

  प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला.

पालकमंत्र्यांनी सांगितले की, जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व अभियानांमधून लोकांपर्यंत अधिकाधिक लाभ पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात फलोत्पादन योजना, रोजगार हमी योजना सारख्या योजनांमधून तळागाळातील शेतकरी, ग्रामिण जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यात आला आहे. शासन आपल्या दारी, महसूल सप्ताह, महाआरोग्य शिबिर सारख्या उपक्रमांमधून गोरगरीब सामान्य जनतेला विविध योजना, दाखले तसेच आरोग्य सुविधांचा लाभ देण्यात आला आहे. पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात महा एक्स्पो प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. मेरी मिट्टी, मेरा देश हे अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविले जात आहे. आपला जिल्हाही या अभियानात सहभागी आहे. आपल्या जिल्ह्यातून 156 कलश माती अमृत वाटिकेसाठी दिल्ली येथे रवाना होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नव मतदारांनी व्होटर्स हेल्पलाईन या मोबाईल ॲपद्वारे नाव नोंदणी करावी,असेही आवाहन केले.

मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास आलेल्या स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, शहीद जवान ऋषिकेश अशोक बोचरे यांच्या पत्नी श्रीमती प्रियंका बोचरे यांना ताम्रपट  प्रदान करण्यात आला.  तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना ट्रायथॉन स्पर्धेतील यशाबद्दल, तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल गोविंद राठोड,  चंद्रशेखर देवकर, सुभाष तायडे, राजेंद्र देवकर, कैलास चौधरी, प्रल्हाद शिंदे, मनिष मुगदल या पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शूभम धूत विहा मांडवा ता. पैठण यांना राष्ट्रिय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच ललित कला पदवी-पदविका वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

चित्ररथास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

मराठवाडा मुक्तीसंग्रामाबाबत नव्या पिढीपर्यंत माहिती पोहोचविणे, तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. हा रथ आता जिल्ह्यात मंडळनिहाय जनजागृती करणार आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, म.न.पा. आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया,पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपायुक्त जगदीश मिनीयार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.