‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा-पालकमंत्री संदिपान भूमरे

‘शासन आपल्या  दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर ,२२ मे  / प्रतिनिधी :-‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना  अनेक शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानांतर्गत कन्नड येथे येत्या 26 मे रोजी ‘शासन आपल्या दारी’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे नियोजन सुक्ष्म पध्दतीने करा, असे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात  ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी आढावा घेतला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केलेल्या नियोजनाच्या अनुषंगाने सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

            श्री भूमरे म्हणाले शासनाने कल्याणकारी योजनांचा लाभ अनेक लाभार्थ्यांना दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे या उपक्रमाद्वारे साध्य होणार आहे. लाभार्थ्यांना कार्यकमाच्या ठिकाणी घेवून येण्यासाठी गावनिहाय नियोजन करताना व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            डॉ कराड म्हणाले  केंद्र शासनाने देखील अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना दिलेला आहे. विशेषत: प्रधानमंत्री स्वनिधी येाजना आणि आयुष्यमान भारत योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश करावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉक्टरांचे पथक तैनात ठेवण्याचे निर्देश देखील त्यांनी  दिले.

            जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जनार्दन विधाते यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना जेवण, पाणी तसेच उन्हाची तीव्रता पाहता ताक देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी केंद्र ठिकठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी 18 प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत.  तसेच कार्यक्रमाच्या दिवशी कन्नड येथील  टोल नाका सर्वांसाठी खुला करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.