छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल २५ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन

ठाणे,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-रविवार, दि.13 ऑगस्ट रोजी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने 9 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीने 25 ऑगस्ट 2023 पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होवू न देता त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.

कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी मिळून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आज रुग्णालयास भेट देवून झालेल्या मृत्यूबाबतची माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.राकेश बारोट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अति.आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ज्या दिवशी १८ जणांचा मृत्यू झाला त्या दिवशी ९१ रूग्ण दाखल झाले तर २२ जणांवर शस्त्रक्रिया झाल्या, त्यामुळे रूग्णालयावर तसेच येथे होणाऱ्या उपचारांवर नागरिकांचा विश्वास असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सिव्हिल रुग्णालय सद्य:स्थितीत मनोरूग्णालय येथे सुरू असून तिथे  ३०० खाटा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रूग्णांच्या सोईसाठी दोन्ही ठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. रुग्ण दगावल्याची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नमूद केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणांहून रुग्णांच्या सोयीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तात्काळ सुरू करावी, अतिदक्षता विभागातील बेडस् ची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करावी. रुग्णांच्या उपचारांसाठी ज्या काही अत्यावश्यक सेवा कार्यान्वित करावयाच्या असतील त्या तात्काळ कराव्यात. निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठित

 ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात  शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते रविवार 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वा. या 10  तासांच्या कालावधीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची योग्य ती चौकशी करून पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी शिफारस व अहवाल करण्याकरिता समिती गठित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार, आरोग्य सेवा आयुक्तालयाचे आयुक्त अध्यक्ष असणार आहेत. तसेच सदस्य सचिव म्हणून ठाणे आरोग्य मंडळाचे उपसंचालक, सदस्य म्हणून ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे महानगरपालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक -१, आरोग्य सेवा (राज्यस्तर) सहसंचालक,  वैद्यकीय आरोग्य देखभाल व दुरुस्ती पथकाचे सहायक संचालक, भिषकतज्ञ (आयुक्त, आरोग्य सेवा द्वारे नामनिर्देशित) असणार आहेत.

ही समिती या घटनेचा घटनाक्रम निश्चित करणे, रुग्णालयातील सर्व यंत्रणेची वस्तूस्थिती तपासणे, अशा प्रकारच्या घटना पुन्हा भविष्यात घडू नये याकरीता आवश्यक उपाययोजना, शिफारशी सुचविणे,  रुग्णालयात दहा तासांत १८ रुग्ण दगावल्याने रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामधील व सामान्य कक्षात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी या घटनेबाबत केलेली कार्यवाही / उपाययोजना तपासणे,   रुग्णालयात घडलेल्या घटनेची कारणमीमांसा करणे व त्याअनुषंगाने आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणा, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आदींची चौकशी करणार आहे.

आयुक्त, आरोग्य सेवा या घटनेच्या चौकशीच्या कामकाजाकरीता अन्य विभागातील अथवा कार्यालयातील अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात. समितीला आपला अहवाल शासनास दि. २५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सादर करावयाचा आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे.