वीजचोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या जागेवर चोरून वीज वापरणाऱ्या दोघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणच्या मोंढा नाका शाखेचे सहायक अभियंता जितेंद्र मालुसरे हे 8 ऑगस्ट 2023 रोजी सहकाऱ्यांसह उस्मानपुरा भागात तपासणी मोहिमेसाठी गेले होते. त्यावेळी सिटी सर्व्हे क्र.1971 येथे दोनमजली इमारतीत राहणाऱ्या सुखविंदरसिंग करमसिंग सरदार याने कोटेशन न भरता अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडून घेतल्याचे आढळून आले. या जागेवर यापूर्वी करमसिंग नारायणसिंग सरदार या नावाने असलेल्या ग्राहकाकडे 83 हजार 570‍ थकबाकी आहे.  तसेच अंबादास एच. जोशी या नावाने या ठिकाणी पूर्वी असलेल्या ग्राहकाकडे 28 हजार 310 थकबाकी आहे. या दोन्ही ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला होता. मात्र त्यानंतरही आरोपी या जागेवर वीजचोरी करताना आढळला.

वीज कर्मचाऱ्यांनी संपूर्ण तपासणी केली असता आरोपीच्या घरात 4 फॅन, टीव्ही, फ्रीज, 6 सीएफएल बल्ब व पाण्याची मोटार ही उपकरणे चालू स्थितीत आढळून आली. तसेच याच इमारतीत वरच्या मजल्यावर आरोपीने अय्यूब ईमाम शेख या व्यक्तीस होस्टेल चालवण्यासाठी जागा भाड्याने दिलेली आहे. शेखनेही होस्टेलसाठी चोरीचीच वीज वापरल्याचे आढळले.

सुखविंदरसिंग करमसिंग सरदार व अय्यूब ईमाम शेख यांनी 2143 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 37 हजार 889 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. सहायक  अभियंता मालुसरे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 व  138 अन्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.