‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, ५ऑगस्ट /प्रतिनिधी :-‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा बदल शक्य झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉनक्लेव्ह’चे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्थेत करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित  करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, सीआयआयचे  महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नंदकुमार उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे. राज्याने जीएसटी संकलनात अव्वल स्थान गाठले आहे. 2.7 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन यंदा राज्यात झाले आहे. देशाच्या एकूण संकलनात हे प्रमाण 15 टक्के आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत विकसित करण्याचे ठरविले आहे. हे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचाही वाटा असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्याची अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये प्रसिद्ध उद्योजकांचा समावेश आहे. ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास कसे नेता येईल, यासाठी सर्वांगाने प्रयत्न करण्यात येत आहे.

नागपुरात नवीन विमानतळाच्या कामकाजाला लवकरच सुरुवात होईल. दोन धावपट्ट्या आणि देखणे प्रवासी आणि कार्गो टर्मिनल असेल. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हब’ नागपुरात झाल्यास शासनाचा पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.