‘सलोखा’ योजनेच्या पहिल्या लाभार्थ्यालाऔसा येथे प्रमाणपत्राचे वितरण

औसा येथे महसूल सप्ताह अंतर्गत ‘जनसंवाद’ उपक्रम

लातूर,५ऑगस्ट /प्रतिनिधी :- महसूल सप्ताह अंतर्गत औसा येथे 4 ऑगस्ट रोजी झालेल्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात ‘सलोखा’ योजनेच्या जिल्ह्यातील पहिल्या लाभार्थ्याला प्रमाणपत्राचे वितरण अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांचे जमिनीविषयीचे वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे औसा तालुक्यातील हिप्परगा (क) येथील मुकुंद चंद्रकांत माने आणि श्रीमती सुनिता दयानंद सपकाळ पहिले लाभार्थी ठरले.

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांच्या अदलाबदल दस्तासाठी सलोखा योजनेअंतर्गत नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येते. अदलाबदल दस्तांसाठी नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क व एक हजार रुपये नोंदणी फी आकारण्याची सवलत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अदलाबदली दस्तासाठी दोन्ही जमिनींच्या व्यवहारापोटी संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मूल्यांकनाच्या 4 टक्के मुद्रांक शुल्क व एक टक्के नोंदणी शुल्क असे एकूण 5 टक्के रक्कम शासन जमा करावी लागली असती, सलोखा योजनेमुळे यामध्ये सवलत मिळणार आहे. तसेच दिवाणी व महसुली दावे दाखल होण्याचे प्रमाण कमी होवून प्रशासकीय वेळ वाचणार आहे. त्यामुळे जनतेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांनी यावेळी केले.

औसा तालुक्यातील सर्व महसूल मंडळ विभागाच्या मुख्यालय स्तरावर शेतकऱ्यांच्या जमीन विषयक नोंदी तसेच फेरफार अदालतींचे आयेाजन करून महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये सदविण्यात आल्या. सलोखा योजनेविषयी जनजागृती करण्यात आली. औसा-उजणी मंडळातील मंजूर केलेले 17 फेरफार, त्याचे सातबारा व 8-अ तसेच अकरा रेशनकार्ड व 27 संगायो लाभार्थीचे मंजुरीपत्र यांचे वितरण अपर जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत महास्वामित्व योजनेअंतर्गत मौजे रिंगणी व गुळखेडा येथील गावठाण मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणी करून मिळकतींची सनद व मोजणी नकाशे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अपर तहसीलदार निलेश होनमोरे, भूमी अभिलेख उपाधीक्षक हेमंत निगडे, दुय्यम निबंधक विशाल जगदाळे, निवासी नायब तहसीलदार दत्ता कांबळे, नायब तहसीलदार सुरेश पाटील, मंडळ अधिकारी डी. एन. भुजबळ, तलाठी विकास बिराजदार यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.