संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल… पण विधानसभेत गदारोळ

महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्यास कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती

मुंबई : देशाच्या महानायकांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जनतेच्या व राजकारण्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करत असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही या प्रश्नासंदर्भात आज विधानसभेत (VidhanSabha) गदारोळ झाला. गेले काही दिवस भिडेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंबंधी विधानसभेत बोलताना माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान १५३ (अ), ५००, ५०५ (२), ३४ तसेच म.पो.का सह कलम १३५ अन्वय २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माध्यमांमध्ये जे विविध व्हिडिओ फिरत आहेत त्यांचे व्हॉईस सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड यांनी जी तक्रार केली आहे ती अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करण्याचा अधिकार नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल

महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानपरिषद आणि विधानसभेत या दोन्ही सभागृहात त्यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अमरावती पोलीसांनी नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी दोन पुस्तकांतून काही मजकूर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वाचून दाखविला. ही दोन्ही पुस्तके काँग्रेस नेत्यांनी लिहिली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. कोणत्याही महापुरुषांचा अपमान हे सरकार सहन करणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावरसुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. संभाजी भिडे गुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि किल्ल्यांची माहिती बहुजन समाजाला देऊन ते समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे. पण  त्यांना महापुरुषांवर अवमानजनक वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे महापुरुषांवर कोणीही अशाप्रकारे वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

‘गुरुजी’ शब्दावरुन विधानभवनात खडाजंगी ; फडणवीस आणि चव्हाण आमनेसामने

 यावेळी फडणवीसांनी संभाजी भिडेंचा उल्लेख ‘गुरुजी’ असा केल्याने विरोधक चांगलेचं आक्रमक झाले.

संभाजी भिंडेविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. यावेळी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी केली जाईल. अमरावती येथील सभेचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात व्हायरल होतंय त्याचे व्हाईस सॅम्पल घेण्यात येतील, असं अमरावती पोलिसांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, संभाजी भिडे यांचा ‘गुरुजी’ उल्लेख करण्यावरुन विरोधक आक्रमक होताच फडणवीस यांनी “आम्हाला ते गुरुजी वाटतात. त्यांचं नावचं गुरुजी आहे”, असं सांगितलं.

भिडेंच्या उल्लेख गुरुजी करण्यावरुन विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. “फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात देशात कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव जो कुणी निर्माण करेल, त्याविरोधात सरकार कारवाई करेल. अमरावतीला जे घडलं, तिथेही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता. त्यावर तुम्ही कारवाई केली. पण प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना तुम्ही दुसरं महत्वाचं वाक्य उच्चारलं की महिमामंडन कुणी करु नये. तुम्ही त्या माणसाला गुरुजी म्हणतात, काही पुरावा आहे का तुमच्याकडे?” असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, “गुरुजी म्हणायला माझी हरकत नाही. तुमच्याकडे पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये पीएचडी असल्याचं तसंच प्राध्यापक होतो, असं सांगतोय. त्याची संस्था नोंदणीकृत आहे का? त्याचे अहवाल दिलेत का? जमाखर्च दिला का? हे महिमामंडन नाही का?” असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले.

चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस मात्र चांगलेचं संतापले. चव्हाण यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, “त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं याचा मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? हे मतांचं राजकारण चालू आहे. ही मतांची बेगमी आहे. या देशातल्या कोणत्याही महापुरुषाचा अवमान सहन करणार नाही. कुणीही असू द्या. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी मी कारवाई करेन”, असं उत्तर फडणवीस यांनी चव्हाण यांना दिलं.