औरंगजेबाच्या स्टेटसवरुन विधानसभेत गदारोळ

मुंबई : आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा ‘सर तन से जुदा’ आणि ‘औरंग्या माझा बाप आहे’, अशा घोषणा देणारे हे लोक आहेत. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. यावेळेस अब्बु आझमी  आणि रईस शेख  यांना उद्देशून नितेश राणे गद्दार म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले, तुम्ही आमच्या मतांवर निवडून येता आणि इथे येऊन धिंगाणा घालता? यावेळेस नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एस. आय. टी. स्थापन करण्याची विनंती केली. शिवाय ते म्हणाले की आपल्याच विभागाचे काही लोक, काही सडके आंबे अशा प्रकारच्या लोकांना मदत करतात. या लोकांच्या विरोधातही चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या प्रश्नाचे समाधान केले. एस. आय. टी. स्थापन केली जाईल तसेच औरंगजेब स्टेटस प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल असं ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाकरता दंगे होणं, एखादा सामाजिक तणाव असणं हे योग्य नाही. आपण एक प्रागतिक राज्य आहोत त्यामुळे आपल्या प्रगतीवरही याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे एस. आय. टी. द्वारे योग्य चौकशी केली दोईल. त्याचप्रमाणे एखादा मिटण्याची शक्यता असतानाही तो मिटवण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली असेल तर त्यावरही योग्य चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.