1.32 लाख प्रेक्षक क्षमता असलेले नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

 ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहेः राष्ट्रपती कोविंद

Image

राष्ट्रपतींनी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचे उद्‌घाटन केले आणि सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हची पायाभरणी केली

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1.32 लाख इतकी असून ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बनले आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. आज अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचे उद्‌घाटन आणि   सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेवची  पायाभरणी केल्यावर ते बोलत होते. हे स्टेडियम केवळ जगातील सर्वात मोठे स्टेडियमच  नाही तर   विविध खेळांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा देखील इथे उपलब्ध आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमला सध्याचे रूप  देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुजरात क्रिकेट संघटनेच्या सर्व अधिकारी, एजन्सी आणि भागीदारांचे त्यांनी अभिनंदन केले. या स्टेडियमच्या वैशिष्ट्यांचे कौतुक करताना  राष्ट्रपतींनी म्हणाले की हरित इमारतीच्या प्रमाणपत्राच्या सुवर्ण मानांकनामुळे  हे पर्यावरण-स्नेही  विकासाचेही उत्तम उदाहरण आहे.

Image

राष्ट्रपती म्हणाले की भारताला ‘क्रिकेटची महासत्ता’ किंवा ‘क्रिकेटचे केंद्र’ म्हटले जाते. म्हणूनच हे उचित आहे की जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम देखील आता आपल्या देशात आहे. या स्टेडियमच्या उभारणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना ते म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्टेडियमचे बांधकाम सुरु झाले  आणि त्यानंतर  अमित शहा यांनी गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून या कामाचा कार्यक्षमतेने पाठपुरावा केला.

राष्ट्रपती म्हणाले की आपले  अनेक युवा क्रिकेटपटू छोट्या खेड्यांमधून आणि भारताच्या मुख्य शहरांमधून  येत आहेत आणि आपल्या  मेहनतीच्या बळावर हळूहळू सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून  उदयास येत आहेत. हे स्पोर्ट्स एन्क्लेव्ह विविध खेळांसाठी उपयुक्त ठरेल  आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देईल, असे त्यांनी नमूद केले. क्रीडा विषयक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने या स्पोर्ट्स एन्क्लेव्हमुळे  अहमदाबाद शहराला  नवीन ओळख मिळेल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या कार्यकाळात गुजरातमध्ये खेळांना बरेच  प्रोत्साहन दिले. राष्ट्रपती म्हणाले की, केंद्र सरकारने देशभरात नवीन क्रीडा संस्कृती विकसित केली आहे. ‘खेलो-इंडिया’ आणि ‘फिट-इंडिया’ सारख्या अभियानांमुळे लोकांमध्ये चांगले आरोग्य आणि खेळांप्रति प्रोत्साहनाला चालना मिळेल.