महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई,१ ऑगस्ट /प्रतिनिधी :-महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी काढले.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नवले, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रथम महसूल विभागाकडे जबाबदारी दिली जाते. निवडणुकीची जबाबदारी देखील महसूल विभागामार्फत यशस्वीपणे पार पाडली जाते. एकूणच राज्यातील नागरिकांच्या भविष्य, भवितव्य आणि कल्याणाची मोठी जबाबदारी हा विभाग सांभाळत असून ती चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महसूल विभागाने दाखले तत्काळ देण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री दीपक केसरकर

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन नागरिकांपर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी मागणी केलेले दाखले विभागाने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथे नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोळीवाड्यांच्या सर्वांगीण विकासाद्वारे शहराच्या मूळ परंपरेची ओळख पर्यटकांच्या माध्यमातून जगभर करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र, धार्मिक स्थळांचा परिसर विकास, घरांना छप्पर, म्हाडाच्या घरांना लिफ्ट, कामगार केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा आदींबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथेच शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी प्रास्ताविकाद्वारे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक कामामध्ये महसूल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या काळापासूनची महसूल जमा करणारी ही महत्त्वाची यंत्रणा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.

महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

दि. 1 ऑगस्ट 2023 हा महसूल दिन असून या दिवशी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आला. त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दि. 2 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयात युवा संवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखल्याबाबत ऑनलाईन प्रक्रियांची माहिती देण्यात येणार आहे, तर मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनडीआरएफ मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. दि. 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहरातील भाडेपट्टे धारकाला, भोगवटादार वर्ग-1, सत्ता हस्तांतरणाबाबत शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मिळकत पत्रिका व नकाशांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिबिर आयोजित करून माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील भूदल व नौदल कार्यालयामध्ये शिबिर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. दि. 6 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी वर्ग यांचे प्रश्न व सेवा विषयक बाबी निकाली काढण्यात येतील. तर दि. 7 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा, शुद्धलेखन व टिपणी लेखन याबाबत मार्गदर्शन तसेच ताणतणाव मुक्तीबाबत व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पथनाट्य आणि सांगता समारंभाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.