अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरण्‍याचा प्रयत्‍न,एकाला अटक

औरंगाबाद ,५ जुलै /प्रतिनिधी :-

महाराणा प्रताप चौकातील अॅक्सिस   बँकेचे एटीएम मशीन चोरण्‍याचा प्रयत्‍न केल्या प्रकरणी एमाआयडीसी वाळुज पोलिसांनी एकाला रविवारी दि.४ जुलै रोजी सायंकाळी अटक केली.

बाबासाहेब रुस्‍तुमराव जाधव (२६, रा. अयोध्‍या नगर, बजाज नगर) असे आरोपीचे नाव असून त्‍याला ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी सोमवारी दि.५ जुलै रोजी दिले.

या प्रकरणात अॅक्सिस  बँक व एटीएमचे कायदेशीर सल्लागार शेख गुफरान अहेमद शेख काशीम (३५, रा. चंपा चौक के.के मार्केट रोशनगेट) यांनी फिर्याद दिली. 

४ जुलै रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्‍या सुमारास महाराणा प्रताप चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्याला  पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान सकाळी ११ वाजेच्‍या सुमारास अॅक्सिस बँकेचे सल्लागार यादव यांनी फिर्यादीला फोन करुन ही माहिती फिर्यादीला दिली. त्‍यानूसार, फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी गुन्‍ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करणे आहे. पोलिस ठाण्‍यात अशा प्रकारचे आणखी तीन गुन्‍हे दाखल असून त्‍याबाबत देाखील आरोपीकडे तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.