मनसे विरुद्ध राहुल गांधी : मनसेच्या बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई ,१८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. अशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आज आक्रमक झाली आहे. त्यांनी शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा काँग्रेस आणि राहुल गांधींना दिला होता. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर, ‘वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखलं आहे. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू झाली. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या मनसेसोबतच भाजपही राहुल गांधींविरोधात महाराष्ट्रभर घोषणाबाजी करत आहेत.

‘आम्ही सावरकर भक्त’ म्हणवणारे पक्ष चिडीचूप राहिले पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठल्याही कारवाईला न जुमानता राहुल गांधींसमोर जाऊन सावरकर प्रेमींचा संताप व्यक्त केला. स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन करणार नाही; महाराष्ट्र सैनिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्याविषयी काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी ह्यांनी अनुद्गार काढले, त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडक निषेध नोंदवत आहेत. भारत जोडो म्हणत पदयात्रेला निघालेले राहुल गांधी नेमके आत्ताच असली बेताल विधानं का करत आहेत? राहूल गांधींच्या ह्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पदाधिकारी शेगावमध्ये जाऊन पक्षाच्या वतीने निषेध नोंदवत आहेत.

मुंबईसह ठिकाठिकाणाहून निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिखलीत जोरदार निदर्शनं केली. शेगावच्या दिशेनं निघालेल्या या कार्यकर्त्यांना चिखलीत अडवण्यात आलं. त्यांनी त्याठिकाणीच ठिय्या मांडला आणि रस्त्यावर असलेली राहुल गांधींची पोस्टर्सही फाडण्यात आली. यावेळी पोलिसांनी संदीप देशापांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधवांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

राहुल गांधींविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातील पोलीसही अॅक्शन मोडवर आले. जिथं जिथं मनसेनं आंदोलन केलं तिथं पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मनसे कार्यकर्त्यांना शेगावच्या आधी चिखलीतच पोलिसांनी अडवलं अनेक मनसैनिकांना स्थानबद्ध केलं. कार्यकर्त्यांना चिखली बाहेर जाऊ न देण्यासाठी चिखलीमध्ये 200च्या वर पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सध्या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन चिखली गेस्ट हाऊसला नेण्यात आलंय. अकोल्यात शेगावाकडे जाणाऱ्या मनसेच्या 100 वर कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी स्थानबद्ध केलंय.