लिंगमळा (लालमाती वस्ती) चा खुलताबाद नगरपरिषदेत समावेश करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई,२८ जुलै /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजना 2019 नुसार लिंगमळा (लालमाती वस्ती) हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट नाही. शहर हद्दीपासून ही वस्ती तीन किमी अंतरावर असून या वस्तीचा नगरपरिषदेत समावेश करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या वस्तीमध्ये मागासवर्गीय समाजाची साधारणत: 25 ते 30 कुटुंबे राहत असून त्यांची लोकसंख्या 158 इतकी आहे. खुलताबाद नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक.1 मध्ये लिंगमळा वस्तीमधील नागरिकांची मतदार यादीत नावे आहेत. नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून या वस्तीस मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.