पशुसंवर्धन अंशकालीन कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात – डिसेंबर पासून वेतन नाही

खुलताबाद,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जिल्हा पशुसंवर्धन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी एक मध्ये कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील दहा अंशकालीन कर्मचाऱ्यांना डिसेंबरपासून पगार नाही. बजेट नसल्याचे कारण सांगून पगार करण्यास टाळाटाळ केली जाते. गेल्या एक वर्षांपासून पगार वाढ करण्याचा निर्णय देखील झालेला आहे. वाढीव पगारही दिला जात नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे.

विशेष म्हणजे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी जिल्हा पशुसंवर्धन केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याचे परिपत्रकाद्वारे आदेश देऊनही वेतन देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

करोना संकटाचा परिणाम जगभर झालेला दिसून येत आहे. यामुळे अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली आहे. मात्र आता हळूहळू सर्वसेवा पूर्वरत आहे. या महाकाय संकटातून जग सावरताना दिसत आहे. एकीकडे काही जण दिवाळीचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे मात्र अहोरात्र सेवा करणाऱ्या  पशुसंवर्धन अंशकालीन कर्मचाऱ्यांची दिवाळी अक्षरश अंधारात होत आहे. पशुसंवर्धन अंशकालीन कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस आजारी जनावरांची काळजी घेत स्वतःला झोकून दिले, तसेच मुक्या जनावरांच्या सेवेत हात भार लावणारे , करोना सारख्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनावरांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वांच्या हाकेला साथ देत आपलं कर्तव्य पूर्ण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आज प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. ही बाब अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी आहे. त्या कर्मचाऱ्यांना ना दिवाळीचा बोनस, ना त्यांना पगार अशी वाईट अवस्था कर्मचाऱ्यांची झाली आहे.  संकटात मात्र अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊन देखील त्यांची दिवाळी बेरंग झाली आहे.