मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अचूकतेने राबवावा- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,१८ जुलै  / प्रतिनिधी :-  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु झाला आहे. हा कार्यक्रम सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच निवडणूक यंत्रणेतील प्रत्येकाने अचूकतेने राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.1/1/ 2024 या अर्हता दिनांकावर राबविला जात आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार , नायब तहसिलदार आदी उपस्थित होते.

मतदारसंघनिहाय  माहिती संकलन, मतदार जनजागृतीसाठी उपाययोजना, जिल्ह्याचा निवडणूक आराखडा याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, छायाचित्र गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, मतदार यादी बिनचूक करणे यासोबतच मतदार संख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या वाढ वा कमी करणे, मतदान केंद्रनिहाय द्यावयाच्या किमान सुविधांची उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला. 

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, रहिवास बदल इ. बाबत आलेल्या अर्जांचा निपटारा करणे ही कामे सर्व कर्मचाऱ्यांनी दक्षतेने व वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले. मतदार केंद्रांच्या प्रत्यक्ष पाहणी करतांना पोलीस विभागाचे अधिकारी व निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे भेटी द्याव्या,अशी सुचनाही त्यांनी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सादरीकरण करुन पुनरिक्षण कार्यक्रम व मतदार जनजागृती इ. बाबत माहिती दिली.