सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी खडावलीतील अपघातातील जखमींची केली विचारपूस

ठाणे,१८ जुलै  / प्रतिनिधी :-भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा खडावली फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या अपघातातील तीन जखमींना भिवंडीतील मायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज सायंकाळी रुग्णालयात जाऊन या जखमींची विचारपूस केली व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिला.

आज सकाळी पडघा येथील खडावली फाट्याजवळ कंटेनर (MH 48 T 7532) व काळी पिवळी जीप (MH04E 1771 ) या वाहनांमध्ये  पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये सहा जण मयत झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. यातील तीन जखमींना भिवंडी येथील मायरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिलीप सरोज (वय २९), चेतना गणेश जारे (वय १९), कुणाल ज्ञानेश्वर भामरे (वय २२) या जखमींची श्री. भुसे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.